निवडणूक निकालापूर्वीच भाजपच्या उमेदवाराचे विजयाचे लागले फलक; कार्यकर्त्यांचा उत्साह
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात निकालापूर्वीच महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शन नगर येथील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे यांनी शंकर जगताप यांच्या विजयानिमित्त अभिनंदनचा फलक लावला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्यात थेट लढत झाली आहे. काल (दि.२०) रोजी मतदान पार पडले, दरम्यान मतदान प्रक्रिया संपताच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका सुषमा तनपुरे यांनी सुदर्शन नगर चौकात “नव्या पर्वाचं कणखर नेतृत्व.. शंकरभाऊ जगताप यांची चिंचवड विधानसभा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन” अशा आशयाचा फलक लावला आहे. आता शनिवार (दिनांक २३) रोजी मतदानाचा निकाल लागणार आहे. त्यानंतरच नेमकं या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. परंतु निकालापूर्वीच लावण्यात आलेल्या या फलकाची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे.
हे सुद्धा वाचा : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ, थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं काय आहे प्रकरण
निकालाआधीच विजयी मिरवणूक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं असून निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. त्यामुळं उमेदवारांमध्ये धाकधूक असताना खडकवासला विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी कमालच केली आहे. निकालाआधीच विजयी मिरवणूक काढली आहे. खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके, भाजपचे भीमराव तापकीर आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांच्यात प्रमुख लढत होती. भाजपचे भीमराव हे तिथले विद्यमान आमदार असून त्यांच्यावर विश्वास दाखवून भाजपनं त्यांना पुन्हा तिकीट दिलं होतं. सचिन दोडके यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती, मात्र अवघ्या २५०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत मनसेने माजी आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं ही तिरंगी लढत चुरशीची होणार हे स्पष्ट होते.
मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये देखील निकाल नेमके कसे लागतील हे स्पष्ट झालेलं नाही. असं असलं तरी सचिन दोडके यांच्या समर्थकांना विजयाचा शंभर टक्के विश्वास आहे. त्यामुळंच त्यांनी निकालाआधीच उमेदवाराची विजय मिरवणूक काढली. दोडके यांच्या विजयाचे पोस्टरही समर्थकांनी परिसरात लावले आहेत. दोडके यांना खांद्यावर घेत वाद्यांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. दोडके हे सुद्धा आमदार झाल्याच्या अविर्भावात लोकांचं अभिवादन स्वीकारत होते. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी… अशा घोषणाही यावेळी त्यांच्या समर्थकांनी दिल्या.