
भाजप आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिका
मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने केले मान्य
पुणे: राज्यातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसून भाजप आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष बनला आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकांमध्ये गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते. दुबार नावे असलेल्या मतदारांचे एकाच ठिकाणी मतदान होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. मनपा निवडणुकांमध्येही मतदार यादीतील घोळ कायम असून निवडणूक आयोगाचा कोणताही धाक सत्ताधाऱ्यांवर राहिलेला नाही, असा आरोप सपकाळ यांनी केला. प्रभाग रचना करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकार करण्यात आले, असेही ते म्हणाले.
गाेचिडासारखे वागणे अजित पवारांना न शाेभणारे
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोज भाजपवर टीका करतात, मात्र तरीही सत्तेत भाजपसोबत चिकटून राहतात. ‘गोचीडासारखे वागणे त्यांना शोभत नाही,’ असा टोला सपकाळ यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असतानाही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ‘नूरा कुस्ती’ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरण, जैन बोर्डिंग जमीन प्रकरण यामध्ये अप्रत्यक्ष भ्रष्टाचार झाला असून त्याचे समर्थन अजित पवार करत असल्याचे सपकाळ म्हणाले.
‘‘राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही, ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढवले नाहीत. केंद्र सरकारने दिलेले दोन कोटी रोजगारांचे आश्वासनही फसवे ठरले आहे. पुण्यात मोफत मेट्रो व बससेवेची घोषणाही हवेतच विरणार अाहे. जातीधर्मातील तेढ आणि गुंडगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांची नार्को चाचणी करावी’’
-हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काॅंग्रेस.
Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…
हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप
भाजपच्या प्रतिनिधींना नागरिकांच्या समस्यांचे काही देणे घेणे नाही, असा आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे केला. मुकुंद नगर – सॅलेसबरी पार्क प्रभागातील काँग्रेस -शिवसेना- मनसे आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी उमेदवार पुष्कर अबनावे ( अ गट ),डॉ. स्नेहल पाड़ळे (ब गट ), योगिता सुराणा ( क गट ),अक्षय जैन (ड गट ) हे उपस्थित होते. आता गप्प बसायचं नाही… आता लढायचं! असा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. तडजोडीची नाही — लढ्याची, गुलामीची नाही — स्वाभिमानाची, संविधान रक्षणाची असल्याचे मत उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले.