"फडणवीसांनी मराठीची पुतना मावशी होऊ नये…", यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांवर टिका (फोटो सौजन्य-X)
मुंबई : शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा असू नये, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी आहे. त्यामुळे बाल मनावर हिंदी लादून मातृभाषेला, माय भूमीला पोरकं करण्याचा सरकारचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. फडणवीसांनी जरी हिंदी भाषेचा जीआर रद्द केला असला तरी, मागच्या दाराने ते हिंदी लादू पाहत आहेत. त्यामुळे नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे ती बर्खास्त करावी, फडणवीसांनी मराठीबद्दल पुतना मावशीचं प्रेम दाखवू नये, अशी घणाघाती टिका काँग्रेसनेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
शालेय शिक्षणात ५ वी पर्यंत हिंदी भाषा असू नये, तसेच फडवणीस सरकारने नेमलेली नरेंद्र जाधव समिती बर्खास्त करावी; या मागणीसाठी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने आझाद मैदानावर केलेल्या धरणे आंदोलनाला सोमवारी (7 जुलै) काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला आणि मराठी भाषेच्या लढ्यात शेवटपर्यंत साथ देणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, फडणवीस सरकारने आणलेलां १ ली ते ४ थी हिंदी भाषेचा जीआर फसवा होता. मराठी माणसाच्या एकीमुळे तो रद्द केला असला, तरी आपण बेसावध राहून अजिबात चालणार नाही. या महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिलं, या मातीसाठी, भाषेसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, मुंबईच्या हक्कासाठी हा लढा होता, आणि आज ही हा लढा आपल्याला द्यावा लागत आहे. ऐन केन प्रकारे हा महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न दिल्लीतून होत आहे.
महाराष्ट्रात आठ हजार गावांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सोय नाही, शाळा नाहीत. विद्यार्थ्यांना प्रथमिक शिक्षणाचे धडे द्यायला शिक्षक नाहीत. आणि सरकारकडे हिंदी भाषा शिकवायला मात्र शिक्षक आहेत. मराठीसह इतर भाषांचे देखील भाजपला वावडे वाटते. कारण, या भाषांना अस्मिता आहे, स्वाभिमान आहे, शौर्य आणि पराक्रमाच्या या भाषा आहेत, या भाषा झुकणाऱ्या नाहीत, वाकणाऱ्या नाहीत, म्हणून या भाषांचा त्यांना दुराग्रह आहे. अशी टिका देखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली.
जे जे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आहे, ते ते सर्व संपवण्याचा डाव या भाजप आणि आरएसएसच्या लोकांचा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा, महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचा घाट याचसाठी घातला जातोय कारण यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, महाराष्ट्र गुलाम करायचा आहे, अशी टीका यावेळी यशोमती ठाकूर यांनी केली.
पुण्यात एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे जय गुजरातचा नारा देतात, त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर गुजरात काय पाकिस्तान आहे का ? म्हणून, शिंदे-फडणवीस विचारतात. गुजरातच काय बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि मणिपूर सारखी छोटी राज्ये देखील भारतीय संघराज्याची अभिन्न अंग आहेत. मात्र या राज्यांवर केंद्र सरकारकडून होत असलेला दुजाभाव पाहता केंद्र सरकारसाठी ही राज्ये पाकिस्तानातील आहेत का ? असा देखील सवाल यशोमती ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला.