रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू
सिन्नर : शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक आपत्तीसह इतर अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यात सिन्नरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जामगाव येथे रविवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास घडली.
गोरख लक्ष्मण आव्हाड (वय ५५) असे यामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जामगाव येथील गोरख आव्हाड हे रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या घरापासून पाचशे फूट अंतरावर असलेल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन रोटा मारण्यासाठी गेले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरी न परतल्याने त्यांचे चुलत बंधू शरद सदाशिव आव्हाड (वय ४९) हे शेतात पाहण्यासाठी गेले. त्यावेळी गोरख हे रोटरच्या पात्यांमध्ये अडकलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर गोरख आव्हाड यांची पत्नी, मुलगा घटनास्थळी धावत आले.
हेदेखील वाचा : बुलडाण्यात 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
गोरख यांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी सिन्नर पोलिसात शरद आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेवटची चक्कर बाकी असतानाच अपघात
दरम्यान, अत्यंत कष्टाळू असलेल्या गोरख यांनी तीन वाजेनंतर दोन शेतांमध्ये रोटा मारण्याचे काम केले होते. बांधाजवळ शेवटचा चक्कर बाकी असताना रोट्याची उजव्या बाजूची पिन निसटली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर न्यूट्रल करून ही पिन बसवत असताना त्यांची पॅन्ट रोट्या मध्ये अडकून मध्ये ओढल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.
तरुण शेतकऱ्याची बुलडाण्यात आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील संतोष शंकर केदार (वय २१) या शेतकरी तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. सततची अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि महाराष्ट्र बँकेचे कर्जाचे ओझे यामुळे निर्माण झालेल्या नैराश्येतून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे.