
शेतकऱ्यांचा संताप ! झेंडूला 10 रुपये किलो देखील भाव नाही; ऐन दिवाळीत फुलं रस्त्यावर फेकली
शेतकऱ्याने दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या अपेक्षेने आणि खर्च करून झेंडूची फुलं बाजारात विक्रीसाठी आणली होती. मात्र, बाजारात १० रुपये किलो देखील भाव मिळत नसल्याने त्यांना संताप अनावर झाला. वाहतूक, तोडणी आणि मजुरीचा खर्चही निघणार नाही, हे लक्षात येताच शेतकऱ्याने रस्त्यावरच फुलं फेकून आपला निषेध नोंदवला.
शेतकरी म्हणाले, अतिवृष्टीने नुकसानीची भर पडलीय, सरकारने ओला दुष्काळही जाहीर केलेला नाही. जाहीर केलेली मदत अद्याप खात्यावर जमा झालेली नाही. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी तरी कशी करायची? तालुक्यात यावर्षी जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने अद्यापपर्यंत ठोस मदत दिलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. फुलांसारख्या नाशिवंत शेतीमालाला वेळेवर आणि योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या दिवशी अशी हतबलता व संतापाची वेळ शेतकऱ्यावर येणं, हे शासन आणि बाजारपेठेच्या व्यवस्थेचं गंभीर अपयश आहे.