राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; नाफेड 'एनसीसीएफ'कडून खरेदी होत नसल्याने चिंतेत भर
देऊळगाव राजे : सध्या देऊळगाव राजे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा काढणी चालू आहे. पण, कांद्याला बाजारात कवडीमोल बाजार भाव मिळत आहे. सोलापूर मार्केटमध्ये ६३ गोण्या कांद्याच्या विकून शेतकऱ्यांच्या हातात खर्च वजा जाता फक्त आठ हजार रुपये आले आहेत. म्हणजे एका गोणीला फक्त १२६ रुपये मिळाले आहेत, अशी जर परिस्थिती मार्केटमध्ये असेल तर शेतकऱ्याचे काय होणार? , असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कांदा पिकाचा वाढलेला खर्च आणि मिळणारा भाव यात मोठी सध्या तफावत दिसत आहे. कांद्याला सध्या रोपवाटिकेपासून कांदा काढणीपर्यंत एकरी एक लाख रुपये खर्च होत आहे. साधारण एकरात २००-२५० गोण्या कांदा निघतो, असा जर बाजार असेल तर ३०-३५ हजार एकरी होणार आहेत आणि खर्च एक लाख रुपये म्हणजे शेतकऱ्याला ६५-७० हजार रुपये एकरी तोटा होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बरेच शेतकरी सध्या कांदा वखारीत आपला कांदा साठवत आहेत, पण अनेक शेतकऱ्यांनी याच वर्षी कांदा लागवड केली आहे. त्यांच्याकडे वखार सुद्धा नाही, मग अशावेळी कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही.
ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी
सध्या शेतकरी अनेक दृष्ट चक्रातून वाटचाल करीत आहेत. कधी अवकाळी पाऊस, तर कधी दुष्काळ, खताच्या आणि मजुरीच्या दरात झालेली मोठी वाढ, निसर्गाचा लहरीपणा यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे, त्यातच आता कांदा दरात अशी घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अजूनच भर पडली आहे.
कांद्याचा एकरी वाढलेला खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत होत आहे. त्यामुळे कांद्याला चाळीस रुपये किलो हमीभाव मिळाला, तरच शेतकरी या संकटातून बाहेर पडू शकतो.
– मदन खेडकर, कैलास गिरमकर, कांदा उत्पादक शेतकरी.