कोल्हापूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही, असे म्हणत निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शासनाने रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला चौपट मोबदला दिला आहे, मात्र याच मार्गातील अंकली ते चोकाक या मार्गावरील रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दुप्पट मोबदल्याच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्याने आत्मदहन करण्याच प्रयत्न केला.
रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या भूमिसंपादनासाठी मोजणी करण्यास अधिकारी येणार असल्याची बातमी समजतात अनेक शेतकऱ्यांनी मोजणी करण्याच्या ठिकाणी हजर राहून सक्त विरोध दर्शवला. अधिकारी व शेतकऱ्यांच्या वादावादीचे प्रकार ही घडले. दरम्यान मुदतीत एका शेतकऱ्याने प्लॅस्टिकच्या कॅनमधून आणलेला ज्वलनशील द्रव्य पदार्थ अंगावरती ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मोजणी अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परत फिरावे लागले.