
खेड तालुक्यात बटाटा काढणीला वेग; घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत
खेड तालुक्यात रब्बी हंगामात बटाटा हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. तालुक्यातील भीमा व भामा नदीकाठचा भाग तसेच चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर आधारित परिसरात मोठ्या प्रमाणावर बटाटा व कांद्याची लागवड केली जाते. यंदा सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावर बटाट्याची लागवड झाली. अडीच ते तीन महिन्यांपूर्वी लावलेले पीक आता काढणीच्या टप्प्यात आले आहे. शेतकरी मजूर, यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने जोमाने काढणी करताना दिसत आहेत.
कोहिनकरवाडी (ता. खेड) येथील शेतकरी बाळासाहेब बाबूराव कोहिनकर यांनी सांगितले की, “यंदा थंडीचे प्रमाण योग्य राहिल्याने बटाट्याचे पीक दर्जेदार झाले आहे. उत्पादनही अपेक्षेपेक्षा चांगले मिळाले; मात्र बाजारभाव अत्यंत कमी असल्याने नफा तर दूरच, उलट नुकसान सहन करावे लागत आहे.” बटाटा लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक असा मोठा भांडवली खर्च येतो. काढणीच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने भाव आपोआप घसरतात, ही दरवर्षीचीच समस्या असल्याचे शेतकरी सांगतात.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो
सध्या बटाट्याला ८ ते १० रुपये प्रतिकिलो (क्विंटलमागे सुमारे ८०० ते १००० रुपये) असा दर मिळत असून, रब्बी हंगामातील नवीन आवक वाढल्याने दरांवर आणखी दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारणीची नितांत गरज शेतकरी व्यक्त करत आहेत. खेड बाजार समितीच्या माध्यमातून सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शीतगृह उभारणीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शेतकरी तसेच सातकरस्थळचे माजी सरपंच मारुती सातकर यांनी दिली. ही योजना प्रत्यक्षात आली तर भविष्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुधारणा करण्याची मागणी
दरम्यान, बटाटा उत्पादक शेतकरी गणेश कोहिनकर यांनीही योग्य बाजारभाव, साठवणूक सुविधा आणि बाजार व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. “उत्पादन वाढले म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढतेच असे नाही. त्यासाठी बाजारातील नियोजन, दर स्थैर्य आणि साठवणूक व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. भरघोस उत्पादन असूनही कमी बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या खेड तालुक्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना शीतगृहासारख्या दीर्घकालीन उपाययोजनांकडे आता मोठ्या अपेक्षेने पाहावे लागत आहे.