चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; व्यापारीही हवालदिल
चाकण : खेड तालुक्यासह चाकण शहर व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि व्यावसायिक वर्गाला बसला असून, सणासुदीच्या काळातही नागरिक पावसामुळे घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पिके पाण्यात बुडाली आहेत. सोयाबीन, मका, फ्लावर, कोबी, भाजीपाला, इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आधीपासूनच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
व्यापाऱ्यांची चिंता वाढली
सध्या नवरात्र उत्सव सुरू असून दसरा तोंडावर आला आहे. रविवारी आठवडे बाजाराचा दिवस असूनही सकाळपासून सतत पाऊस सुरू असल्याने ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले नाहीत. शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा असली तरी हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज दिल्याने व्यापाऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पावसामुळे व्यवसाय ठप्प राहण्याची शक्यता असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातून शेतकरी बाजारात आपला माल विक्रीसाठी आणतात. परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आणि खरेदीदारांनी बाजारात येण्यास पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे.
पाणी साचल्याने नागरिक त्रस्त
सततच्या पावसामुळे चाकण शहर तसेच महामार्ग लगत असणाऱ्या जोडरस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले असून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी रस्ते, गल्लीबोळात चिखल व पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी
परतीच्या पावसामुळे पिकांना लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र सततचा पाऊस, पूरस्थिती आणि निचरा यामुळे हा पाऊस वरदान ठरण्याऐवजी शाप ठरत आहे, असे नागरिक सांगत आहेत. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.