सीमाभागातील कारखान्यांच्या अडचणी वाढल्या; कर्नाटकातील साखर हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरु
गडहिंग्लज : कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगाव, विजयपुर, बागलकोट, गदग, दावणगिरी, बेल्लारी आणि हावेरी जिल्ह्यांतील साखर कारखाने २० ऑक्टोबंरपासून उस गाळप सुरू करतील, असा फतवा काढल्याने कर्नाटक हद्दीतील साखर कारखाने या वर्षी दहा दिवस आधी सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी जास्त भाव आणि लवकर गाळपाच्या आशेने कर्नाटकातील कारखान्यांकडे वळतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील तीन व सोलापूर जिल्ह्यातील दोन अशा पाच साखर कारखान्यांनी विनापरवाना गाळप सुरू केल्याने महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी त्या कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे सीमाभागातील साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करण्याची शक्यता कमी असली तरी महाराष्ट्रातील उस कर्नाटकात गाळपासाठी जाण्याची शक्यता अधिक आहे.
कर्नाटकातील साखर कारखाने गेली अनेक वर्षे अपेक्षित गाळपापेक्षा जास्त गाळप करून महाराष्ट्रातील उस पळवत आहे. गेल्या वर्षीच कर्नाटकात महाराष्ट्रातूন सुमारे ४५ लाख मेट्रिक टन ऊस गेला होता या वर्षी दोन्ही राज्यांचा हंगाम १ नोव्हेंबर दरम्यान सुरु करण्याची शक्यता होती पण पुन्हा कर्नाटकने महाराष्ट्राच्या हंगामापूर्वी दहा दिवस आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका महाराष्ट्राच्या कारखान्यांना बसणार आहे
राज्य सरकारच्या मंत्री समितीच्या बैठकीत कर्नाटकने लवकर हंगाम सुरू केल्यास सीमा भागातील कारखाने देखील हंगाम सुरू करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात असताना एकीकडे महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी विनापरवाना लवकर उस गाळ्प केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला असल्याने व कर्नाटकातील हंगाम सुरू होत असल्याने सीमाभागातील कारखान्यांची कोंडी झाली आहे.