
शिरोलीत ऊसाच्या फडाला भीषण आग; 30 एकर ऊस जळून खाक, वेळीच खबरदारी घेतली म्हणून...
शिरोली : हालोंडी (ता. हातकणंगले) येथील 30 एकर ऊसाच्या फडाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीचा जनावरांना धोका निर्माण झाला होता. पण नागरिकांच्या समयसूचकतेमुळे जनावरांचे जीव वाचले. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
हालोंडी गावाशेजारी पंचगंगा नदीकडील भागात घुमाई बंधू व किरण पाटील यांची सुमारे तीस एकर आडसाल ऊसाची लागण आहे. या ऊसाच्या फडामधून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली असून, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ही आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बघता बघता जवळपास ३० एकर ऊसाचा फड जळून खाक झाला. ही आग लागल्याचे समजताच गावातील नागरिक व स्थानिक शेतकऱ्यांनी धाव घेऊन आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
दरम्यान, शेजारीच घुमाई बंधूंचे जनावरांचे तीन गोठे असल्याने या आगीची झळ जनावरांना लागणार असे निदर्शनास येताच गोठ्यातून जनावरे बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवण्यात आली. या लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा जळालेला ऊस शेतात पडून नुकसान होण्यापूर्वी साखर कारखान्याकडे या शेतकऱ्यांचा जळालेला ऊस तत्काळ तोडून नेण्याची मागणी होत आहे.
कापड बाजारात भीषण आग
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सुरतमधील कापड बाजारात भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पर्वत पाटिया परिसरातील राज कापड मार्केटमध्ये आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून, सुमारे २० ते २२ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या गाड्यांच्या मदतीने आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे आणि कूलिंगचे कामही तातडीने सुरु करण्यात आले होते.
हेदेखील वाचा : शॉर्टसर्किटमुळे 10 एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान