सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी भाडेकरारची ‘इनोव्हा’ कार सोडून अध्यक्षांची ‘सफारी’ वापरणे गुरुवारपासून पसंत केले आहे. मार्च अखेर जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपली. त्यामुळे झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीचे सभापती व पंचायत समितीचे सभापती यांच्या गाड्या कार्यालयात जमा करण्यात आल्या.
अध्यक्षांची ‘सफारी’ दक्षिण पंचायत समितीच्या कार्यालयात धूळ खात पडून होती. आमदार संजय शिंदे हे झेडपी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात ‘सफारी’ गाडी खरेदी करण्यात आली. पण त्यांनी कधीच ही गाडी वापरली नाही. तत्कालीन सीईओ राजेंद्र भारूड हे ही गाडी वापरत होते. त्यानंतर पुढे झेडपी अध्यक्ष म्हणून अनिरुद्ध कांबळे यांची निवड झाली. त्यामुळे त्यांना ही गाडी देण्यात आली तर सीईओसाठी भाड्याने ‘इनोव्हा’ गाडी घेण्यात आली. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर झेडपीवर प्रशासकराज सुरू झाले. त्यामुळे भाड्याच्या गाड्या रद्द करून अध्यक्षांची ‘सफारी’ गाडी प्रशासकांनी वापरावी, अशी मागणी होत होती. पण याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे ‘लोकशासन आंदोलन पार्टी’चे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
विभागीय आयुक्तांचे आदेश
प्रशासकाने वायफळ खर्च करून झेडपीच्या मालकीच्या गाड्या वापराव्यात, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. याची दखल घेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सीईओ स्वामी यांना आदेश दिले. त्यामुळे सीईओ स्वामी यांनी गुरुवारपासून ‘सफारी’ वापरणे पसंत केल्याचे दिसून आले.