चांगल्यासाठी कितीही गुन्हे दाखल होऊ देत ! संजय गायकवाड यांनी ठणकावले
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. त्यातच शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत एक विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. अखेर याच विधानावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम खाते जगात कुठेही नाही. छाप्यात 50 लाख पकडले तर ते 50 हजारच दाखवतात असे, वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, ‘माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल. पोलिस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळे पोलिस हे अकार्यक्षम असून बुलडाण्यातील 2 पोलिस हे चोरांचे सरदार आहेत. चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा ? असा सवाल करत त्यांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला.
तर याचवेळी त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्र पोलिस खात्यासारखे अकार्यक्षम खाते भारतात, जगात कुठेही नाही, असे गायकवाड यांनी म्हटले होते.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. BNS 296, 352 व पोलीस अधिनियम 1922 चे कलम 3 (पोलिसांबद्दल अप्रितीची भावना चेतवणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा होत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
अन्यथा अॅक्शन : फडणवीस
संजय गायकवाड यांच्या या विधानासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कारवाईचा इशारा दिला होता. ‘मी एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की त्यांना (संजय गायकवाड यांना) कडक समज द्या, अन्यथा अॅक्शन घेतली जाईल’, असा सूचक इशाराच फडणवीसांनी दिला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.