
वल्लभनगरमध्ये तरुणाचा जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाची धाडसी मोहीम; मोठी दुर्घटना टळली
अग्निशमन विभागाच्या पिंपरी नियंत्रण कक्षास घटनेची माहिती मिळताच पथक तत्काळ रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच पथकाने परिस्थितीचे मूल्यमापन करून प्रशिक्षित पद्धतीने ‘स्विफ्ट रेस्क्यू ऑपरेशन’ हाती घेतले. तरुण उडी मारण्याच्या तयारीत असतानाच वरिष्ठ फायरमन भूषण येवले यांच्या इशाऱ्यावर अग्निशामक जवान दीपक कोठे यांनी चपळाईने झेप घेत त्याला पकडले आणि इतर जवानांच्या मदतीने सुरक्षित खाली आणले. पथकातील तेजस पवार, जय जमादार, स्नेहा जगताप आणि वाहनचालक विशाल बानेकर यांनीही कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
वेळीच माहिती मिळाल्यामुळे आणि पथकाच्या त्वरित कार्यक्षमतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. सदर व्यक्तीने आत्महत्येच्या उद्देशाने मजल्यावर चढल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.
अग्निशमन दलासाठी प्रत्येक क्षण ही वेळेशी सुरू असलेली शर्यत असते. वल्लभनगर येथील घटनेत जवानांनी परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करून प्रशिक्षित पद्धतीने व्यक्तीस सुरक्षित खाली आणले. — व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
दरम्यान, अग्निशमन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना दिसल्यास तातडीने १०१ वर संपर्क साधावा.
ही बचाव मोहीम फक्त प्रशंसनीयच नव्हे तर शहरासाठी अभिमानास्पद आहे. छोट्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागू शकते, तरीही पथकाने संयम, तांत्रिक कौशल्य आणि समन्वयाने कार्य करून तरुणाचा जीव वाचवला. — ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका