
फोटो सौजन्य - Social Media
जळणे, कापणे, धक्का लागणे किंवा किरकोळ जखम होणे यासारख्या घटना प्रवासादरम्यान घडत असतात. अशावेळी प्रथमोपचार पेटीतील बॅन्डेज, वेदनाशामक औषधे आणि इतर साहित्य तातडीने उपयोगी पडतं. परंतु खामगाव बसस्थानक परिसरातील अनेक बसेसची पाहणी केली असता, अनेक वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे किरकोळ जखम झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी प्रवास संपल्यानंतर थेट दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.
विशेष म्हणजे प्रवाशांना बसमध्ये चढताना, उतरताना किंवा प्रवासादरम्यान लोखंडी पत्रे, खिडक्या किंवा सीटचा धक्का लागून किरकोळ दुखापती होण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशा परिस्थितीत प्रथमोपचार पेटी असणे अत्यावश्यक आहे. काही वर्षांपूर्वी परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक बसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र कालांतराने चालक आणि वाहकांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे.
याबाबत सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे यांनी सांगितले की, जुन्या काही बसेसमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध नसू शकते. मात्र नव्या बसेसमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. तसेच ज्या बसेसमध्ये पेट्या उपलब्ध नाहीत, त्या संदर्भात चालक आणि वाहकांना सूचना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बसेसमध्ये तातडीने प्रथमोपचार पेट्या उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.