कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; मारहाण आधी तरुणाने नाहीतर...
कल्याण : कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत झा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र, गुरुवारी याप्रकरणातील नवा व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये सुरुवातीला रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील महिलेला कानाखाली मारली. त्यानंतर आरोपी तरुणाने मारहाण केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन व्हिडिओमध्ये गोकुळ झा, रंजीत झा त्यांची आई आणि सून उभे असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी आणि गोकुळ झा यांच्यात शाब्दिक वाद झाला. यामध्ये गोकुळ झा याने तरुणीला पहिले लाथ मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळही केली. यानंतर गोकुळ शांत झाला. त्याच्या आईने रुग्णालयाच्या बाहेर पाठवले. यानंतर रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेला कानाखाली मारली. त्यानंतर गोकुळ झा बाहेरुन धावत आला आणि रिसेप्शनिस्ट तरुणीला जबर मारहाण केली.
मराठी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जानकी रुग्णालयाचे डॉ. मोईन शेख यांनी म्हटले की, तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे व्रण आहेत. आम्ही तत्काळ उपचार सुरू केले आहेत. तसेच तरुणीला मान हलवताना खूप वेदना होत आहे. त्यामुळे या मारहाणीमुळे तिला पॅरालिसिस होण्याची शक्यता आहे. तरुणीला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
घटना डोळ्यादेखत घडली
घटना माझ्या डोळ्यादेख घडली असून, रिसेप्शनिस्ट तरुणीनेच आधी माझ्या सूनेवर हात उचलला. मुलीने माझ्या सुनेला शिवीगाळ केली होती. त्यानंतर तरुणीने माझ्या सूनेच्या कानाखाली मारली. हा सर्वप्रकार गोकुळ झा याने पाहिले आणि बाहेरुन धावत येत त्याने तिला लाथ मारली. मात्र, त्याने मारहाण करणे योग्य नव्हते, असे गोकुळ झा या तरूणाच्या आईने म्हटले आहे.
आरोपी गोकुळ झा रेकॉर्डवरचा गुन्हेगार
गोकुळ झा हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याच्यावर कल्याण कोळशेवाडी उल्हासनगर या परिसरात दरोड्यासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्याकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी केला आहे.