
कोल्हापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार; माजी महापौर सई खराडे यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
सई खराडे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले असून, २००५ साली त्यांनी महापौरपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. शिवाजी पेठ विभागातून त्यांनी दोन कार्यकाळ नगरसेवक म्हणून काम केले आहे. कृषिभूषण कै. महिपतराव (पापा) बेंद्रे यांच्या कन्या आणि माजी नगराध्यक्ष कै. सखारामबापू खराडे यांच्या स्नुषा म्हणून त्यांचा राजकीय वारसा भक्कम मानला जातो. त्यांच्या प्रशासनिक कार्याची माहिती असलेल्या मतदारांमध्ये आजही त्यांची छाप कायम आहे. त्यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूरमधील शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक पातळीवर शिंदे गट मजबूत करण्यासाठी नेतृत्व सातत्याने प्रयत्नशील असून, सई खराडे यांचे अनुभव, जनसंपर्क आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व पक्षासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्हा आणि राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार असून, या प्रवेशामुळे कोल्हापूरच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. सई खराडे यांच्या प्रवेशामुळे आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांसह स्थानिक राजकारणात शिंदे गट अधिक सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.