कोल्हापूर/दीपक घाटगे; गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते माजी आमदार संजय बाबा घाटगे व त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे हे पिता पुत्र आज मुंबईच्या भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार असून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.
सन १९९८ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती. मात्र कागलच्या राजकीय उलथापालथीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र तरीसुद्धा ते शिवसेनेची चिटकून राहिले होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेशी फारकत घेतली नसली तरी राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना मदत केली होती. त्यामुळे महायुतीचे उमेदवार समरजीत सिंह घाटगे यांचा पराभव झाला होता. तर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेले समरजितसिंह घाटगे यांना तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होऊन त्यांना महायुतीची उमेदवारी मिळाली होती.
विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार संजय बाबा घाटगे यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या तज्ञ संचालक पदी त्यांना घेतले होते तर माजी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांना मश्रीफांनी संधी दिली होती . मात्र आगामी जिल्हा बँक निवडणूक, गोकुळ, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार असल्याने कागलच्या राजकारणात आता मुश्रीफांची कसोटी लागणार आहे . भाजपने पूर्वीपासूनच पक्षाचे विस्तारवादी धोरण, राजकीय महत्त्वकांक्षा बाळगली असल्याने अनेक राजकीय नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षात ओढण्यास यशस्वी झाले आहेत . त्यामुळे कागल तालुक्यातील हा मोहरा उचलण्यास भाजप यशस्वी झाले आहे.
आगामी काळात घाटगे पिता-पुत्रांना भाजपचे ध्येयधोरण राबवावी लागणार असल्याने मुश्रीफांची या तालुक्यात तसेच जिल्ह्यात गोची होणार आहे .कारण पक्ष धोरण पाळावे लागणार असल्याने घाटगेंना सुद्धा इकडे तिकडे पळता येणार नाही. त्याचबरोबर २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने अमरीश घाटगे यांना निवडणूक लढवण्यास सांगितल्यास मुश्रीफांना गप्प बसावे लागणार आहे.
समरजीत सिंह घाटगे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याने मागील काही दिवसापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होते. मात्र घाटगे पिता-पुत्र आता भाजपमध्ये येणार असल्याने त्यांची सुद्धा अडचण होणार आहे. मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, रविकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश करून घेतला जाणार आहे .त्यांच्या या प्रवेशामुळे मात्र पुन्हा भाजपची संघटनात्मक बांधणी त्याचबरोबर ताकद जिल्ह्यात मोठी होणार आहे.