शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संजय पाटील आक्रमक; 'या' तारखेला तासगावात चक्काजाम आंदोेलन
तासगाव : तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे द्राक्ष, ऊस, सोयाबीन, मका, उडीद, भुईमुग आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, पंचनामे सरसकट व्हावेत आणि कर्जमाफी जाहीर करावी, या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत १४ ऑक्टोबर रोजी तासगावमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
अधिकाऱ्यांसोबत चर्चा, आंदोलनाची तयारी
पाटील यांनी तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे आणि नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली.
यावेळी त्यांनी सरसकट पंचनामे आणि तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी असलेले निवेदन दिले. दरम्यान, युवा नेते प्रभाकर पाटील यांनी तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन आंदोलनासंदर्भात निवेदन सादर केले.‘
पंचनाम्यांची गती संथ, शेतकरी अडचणीत’
निवेदनात नमूद केले आहे की, पंचनाम्यांची प्रक्रिया अत्यंत विलंबाने सुरू असून अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डळमळीत झाली आहे. यंदाच्या नुकसानीमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी माणिक जाधव, सुखदेव पाटील, बाबासाहेब पाटील, सुनील जाधव, हणमंत पाटील, महेश पाटील, अविनाश पाटील, संदीप पाटील, शशिकांत जमदाडे, दिग्विजय पाटील, आर. डी. पाटील, जाफर मुजावर, अमित पवार, करण पवार, तुषार हुलवाणे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
“शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाने निर्णय घेतला नाही, तर १४ ऑक्टोबरला तासगाव रस्त्यावर उतरेल.” — संजय पाटील, माजी खासदार
‘शेतकरीप्रेम निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर?’
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. “हे शेतकरीप्रेम निवडणुकीच्या तोंडावरच का उमटतं?” असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात असून, आमदार वं माजी खासदार गटांतील समर्थक आपापल्या नेत्याच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही प्रमुख नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकाच वेळी आंदोलनाची तयारी करत असल्याने तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सध्या राजकीय तापमान वाढलेले आहे.