Fraud
नाशिक : शेअर्सची रक्कम डिमॅट अकाऊंटमध्ये जमा करण्याच्या बहाण्याने भामट्याने वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला. बँक खात्यातील तब्बल 11 लाख रूपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यात वर्ग करण्यात आली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोधर भास्कर भिडे (८३ रा. ऑस्कर प्राईड दातेनगर, सावरकरनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. भिडे यांच्याशी गेल्या २८ डिसेंबर रोजी भामट्यांनी संपर्क साधला होता. ८६०१२३११२२ व ८००१०१२५५३ या मोबाईलधारकांनी फोनवरून संपर्क करत आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून ही फसवणूक केली. भिडे यांनी बँक ऑफ बडोदाचे डिमॅट शेअर्स घेतले. अकाऊंटमध्ये जमा करण्याचा बहाणा करत भामट्यांनी त्यांना मोबाईल एक ऍप इन्स्टॉल करण्यास भाग पाडले.
या ऍपचा ऍक्सेस घेत भामट्यांनी भिडे यांच्या बँक खात्यातील तब्बल १० लाख ८४ हजार ५२२ रूपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यावर वर्ग करून घेत आर्थिक फसवणूक केली. ही बाब निदर्शनास येताच भिडे यांनी पोलीसात धाव घेतली असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करत आहेत.