
फोटो सौजन्य - Social Media
तासगाव : समाजसेवा, अध्यात्म आणि शिक्षण यांचा सुंदर संगम घडवणारे विविध लोकोपयोगी उपक्रम तासगावात राबविण्यात येणार आहेत. तासगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या २५ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त इच्छुक भाविकांना ‘श्री ज्ञानेश्वरी’ या पवित्र ग्रंथाचे पूर्णपणे मोफत वाटप करण्यात येणार असून, या उपक्रमाची तासगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य आणि वाढदिवसाचा योग साधत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ ग्रंथवाटपापुरता मर्यादित नसून, समाजात अध्यात्म, संस्कार आणि वाचन संस्कृती रुजविण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी नगरसेवक तसेच नगराध्यक्ष म्हणून काम करताना तासगाव शहराच्या विकासाचा भक्कम पाया रचला. विकासाभिमुख दृष्टीकोन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी शहराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. माजी खासदार संजय पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची जिल्हाभर ओळख आहे.
सध्या तासगावच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. विजया बाबासाहेब पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत शहराच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही तासगाव नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला सहा वह्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असून, हा उपक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तानसा,विहार, तुळशी तलाव तुडुंब भरले. तलावांत एकूण ६१.९० टक्के जलसाठा
याशिवाय, आषाढी एकादशीच्या निमित्ताने तासगाव शहरातील सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. धार्मिक श्रद्धा आणि समाजसेवा यांचा समन्वय साधणाऱ्या या उपक्रमांमुळे बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
मोफत ‘श्री ज्ञानेश्वरी’ ग्रंथ प्राप्त करू इच्छिणाऱ्या भाविकांनी आपले नाव व संपर्क क्रमांक लवकरात लवकर नोंदवावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अध्यात्माचा प्रसार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ आणि समाजसेवेची परंपरा जपणारे हे सर्व उपक्रम तासगावच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक संदेश देणारे ठरणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.