
फोटो सौजन्य सोशल मीडिया
लॉयडस मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांनी पुढाकार घेऊन सुरू झालेल्या या अकादमीत ४० विविध ट्रेड्समध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. आतापर्यंत ४,५०० हून अधिक स्थानिक युवकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली.
या अकादमीचा मुख्य उद्देश गडचिरोलीतील युवकांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन जागतिक रोजगार बाजारपेठेसाठी सक्षम बनवणे हा आहे. खाणकाम, तांत्रिक क्षेत्र आणि विविध औद्योगिक व्यवसायांशी संबंधित ४० ट्रेड्समध्ये प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक तरुणांना केवळ नोकरी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता कुशल व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून पुढे येण्याची संधी मिळणार आहे.
अकादमीच्या सध्याच्या प्रशिक्षण तुकडीमध्ये ५५ टक्के महिला प्रशिक्षणार्थी आहेत. महिलांनाही औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रात समान संधी मिळाव्यात, यावर विशेष भर देण्यात आला आहे. गडचिरोलीतील युवकांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात प्रशिक्षण घेण्याची, तर मुलींना पापुआ न्यू गिनी येथे जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल
उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी. प्रभाकरन यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. गडचिरोलीत खाणकाम सुरू करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा स्थानिक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, असा आपला आग्रह होता. आज येथील तरुण स्वतःचे भविष्य स्वतः घडवत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
जगातील सर्वात मोठे ३५० टन क्षमतेचे डंपर गडचिरोलीत दाखल झाले असून, आता स्थानिक मुलीही अशी अत्याधुनिक यंत्रे चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या कार्यक्रमात ऑटोमोटिव्ह फोर-व्हीलर ट्रेनिंग लॅबोरेटरी, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर मायनिंग आणि मायनिंग मेट ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करण्यात आले.
FLSmidth कंपनीच्या भागीदारीत उभारण्यात येणाऱ्या अॅडव्हान्स्ड मिनरल प्रोसेसिंग वर्कशॉपची पायाभरणीही यावेळी करण्यात आली. अशा प्रकारची ही कंपनीची पहिली कार्यशाळा असणार असून, त्यातून अत्याधुनिक खनिज प्रक्रिया सुविधा आणि विशेष तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने गडचिरोलीत सुमारे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, कंपनीच्या मनुष्यबळात २५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. औद्योगिक विकासासोबत जल, जमीन आणि जंगलाचे संरक्षण करणेही महत्त्वाचे असल्याचे बी. प्रभाकरन यांनी स्पष्ट केले. कौशल्य विकास, स्थानिक रोजगार आणि शाश्वत औद्योगिक प्रगती यांच्या माध्यमातून गडचिरोलीला ज्ञान, कौशल्य आणि उद्योजकतेचे केंद्र बनवण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.