chandrakant khaire
औरंगाबाद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टीनंतर संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर यांनी किर्तीकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही किर्तीकर यांचा समाचार घेतला आहे.
गजानन किर्तीकर हे आमचे मार्गदर्शक आहेत. औरंगाबाद (Aurangabad) आणि जालन्यासाठी (Jalna) त्यांनी खूप मोठे काम केले होते. आम्हाला घडवण्यामागे किर्तीकर यांचा हात आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंबरोबर त्यांनी काम केले. दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार एवढे देऊन सुद्धा गद्दारांबरोबर गेल्याने मला दु:ख झाले, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका, असे गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंना सांगितले होते. त्यावर खैरे यांनी म्हटले, आता सर्वजण हेच बोलत आहेत. मग, ज्यांनी शिवसेना फोडली त्या गद्दारांबरोबर जायचे का? पक्षात राहून मते मांडायची होती. पण, यावर किर्तीकर कधीच बोलले नाहीत. गेले अडीच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार होते, तेव्हाच बोलायचे होते. मात्र, त्यांना म्हातारपणी म्हातारचाळे लागले आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.