शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर
Gandhi Jayanti In Shevgaon : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आणि ‘नमो सेवा गाथा’ या उपक्रमाचे औचित्य साधत सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या आयोजना मध्ये श्रमदान , ग्रामस्वच्छता अभियान आणि पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय कल्याणकारी योजनांचा जागर करण्यात आला.
Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!
महात्मा गांधीजींच्या जयंतीचे औचित्य साधून भारदे हायस्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवली. शेवगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय, शहराचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले जनता व्यासपीठ तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात आणि प्रमुख ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत स्वच्छता राबवण्यात आली.त्याच बरोबर श्रमदान देखिल करण्यात आले. या उपक्रमाचे शहरवासीयांकडून मोठे कौतुक करण्यात आले आहे.
‘नमो सेवा गाथा’ या विशेष उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. पीएम आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची माहिती सोप्या आणि रंजक भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. या पथनाट्याला शेवगाव शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये नगरसेवक कमलेश गांधी, सागर फडके, खंडू बुलबुले, डॉ. नीरज लांडे, विनोद मोहिते, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश फलके आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश घेवरीकर, प्रा. नितीन मालानी, प्रा. सुनील डाखुरकर तसेच माजी विद्यार्थी रितेश दुबे यांच्या विशेष संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले. या सामाजिक व जनजागृतीपर अभियानामुळे शेगाव शहरात स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला गेला.






