Ganeshotsav combines tradition with modernity, organizes social media reels and blogger competition
इस्लामपूर : यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक सजावट, भव्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर करण्यात येतात. याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. शहर व परिसरातील नामांकित गणेश मंडळांनी आकर्षक पारितोषिके जाहीर केल्याने तरुणाईत रिल्स व ब्लाँग बनविण्याची चुरस निर्माण झाली आहे. छोट्याशा व्हिडिओवर मिळणारे व्ह्यूज आणि फॉलोअर्स यामुळेच रिल्सस्टार्स व ब्लाँगर ‘भाव’ खाऊन जात आहेत.
कमी वेळेत जगभर आपला गणेशोत्सव पोहोचविण्यासाठी मंडळामध्ये चुरस लागली आहे. गणेशोत्सवामध्ये इस्लामपुरातील भाजी मार्केट गणेश मंडळाच्या वाराणशीच्या धर्तीवर धार्मिक विधी व आरतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. येथे तरुणाई मोबाईल हातात घेऊन रिल्स बनविण्यासाठी पुढे सरसावली होती. सकाळपासूनच मंडपात मोबाईल कॅमेऱ्यासह हजेरी लावत आहेत. सजावट, गणेशमूर्तीची आरास, देखावे, नृत्य, भजन, ढोल-ताशांचा गजर या सर्वांचे क्रिएटिव्ह रील्स तयार होत आहेत. मंडपांच्या बाहेर ‘लाईव्ह लोकेशन’साठी खास कोपरे सजवले जात आहेत. गणेशाच्या आगमन मिरवणुकीपासून रील काढण्यासाठी तरुणाईत मोठी चढाओढ दिसली.
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ‘रील स्टार्स’
अनेक नामांकित रील स्टार्स, इन्फ्लुएन्सर्स आणि स्थानिक कलाकार मंडळांच्या मंचावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक रंगत आली आहे. काही मंडळांनी तर खास ‘रील स्टार’ना निमंत्रित केले आहे. यानिमित्ताने तरुणाईला आकर्षित केले जात आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या रील स्टार्समध्ये स्थानिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, युवक संघटनांचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच काही लोकप्रिय कलाकार व गायकांचा समावेश आहे. आकर्षक पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी ही तरुणाईला मोठे बक्षीस ठरत आहेत. गणेशोत्सवातील पारंपरिक भक्तिभाव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम या उपक्रमातून घडत असल्याने, ‘गणराय डिजिटल युगाशी जोडला गेला’, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
इस्लामपूरमधील रील स्टार रवी दाजी म्हणाले की, यंदाच्या गणेशोत्सवात रील स्टार्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना अचानक वाढते महत्त्व मिळू लागले आहे. अनेक मंडळांनी कार्यक्रमात स्थानिक रील स्टार्सना खास आमंत्रित केले आहे. त्यांच्यासोबत फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी उसळली आहे. हा केलेचा व कलाकारांचा सन्मान आहे.
गौरी सजावटीत रील स्टार्सची असणार धूम..!
गौरी पूजन हा महाराष्ट्राच्या घराघरात होणारा श्रद्धेचा सण आहे. देवीचे आगमन, सजावट, भजन, आरती, नृत्य-कीर्तन यामुळे या उत्सवाचे सोहळे सर्वदूर गाजतात. इस्लामपूर शहरात यावर्षी विविध महिला मंडळे आणि उत्साही महिलांनी आपल्या घरी आकर्षक थीमवर सजावटीची तयारी केली आहे. यामध्ये खास आकर्षण ठरणार आहे ते सोशल मीडियावरील लोकप्रिय रील स्टार्सचे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रिल्सबरोबर ब्लाँगर स्पर्धेचे आयोजन
‘उरूण ईश्वरपूरचा महा गणपती’मंडळा तर्फे रिल्स बरोबर ब्लाँगर स्पर्धेचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने येत्या आठवडाभर सगळीकडे एकच चर्चा असेल ‘कोणता रील स्टार आला? ब्लाँगर कोण होता? किती व्ह्यूज मिळाले? लाईव्ह किती जण बघत होते ?’