Pratap Sarnaik: सर्वासामान्य कार्यकर्ता ते मंत्री; वाचा प्रताप सरनाईक यांचा संघर्षमय प्रवास
भाईंदर (प्रतिनिधी विजय काते): ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या शपथ विधीनंतर मीरा भाईंदर आणि ओवळा-माजिवाडा येथील जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. ठाणे आणि मीरा भाईंदरला लागून असलेल्या ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासाचा आढावा घेतल्यास, आपल्या लक्षात येईल की या भागात शिवसेनेने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या राजकारणातील प्रेरणादायी संघर्षाबद्दल जाणून घेऊया.
वर्धा जिल्ह्यात २५ एप्रिल १९६४ रोजी प्रताप सरनाईक यांचा जन्म झाला. यानंतर त्यांचे वडील बाबूराव सरनाईक कामाच्या शोधात मुंबईत आले. डोंबिवली येथे प्रताप सरनाईक यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. यानंतर त्यांनी एनएसयूआय सदस्य, युवक काँग्रेसचा नेता असा प्रवास सुरु केला. प्रताप सरनाईक यांनी वेळप्रसंगी अगरबत्ती, दिनदर्शिका, आम्लेट- पावची गाडी, रिक्षाचालक अशी कामं देखील केली आहेत. त्यानंतर त्यांनी विहंग इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला.
नाराजीराव छगन भुजबळांवर अखेर पक्षाने दिली प्रतिक्रिया; योग्यवेळी साधणार संवाद…
१९९७ मध्ये प्रताप सरनाईक ठाणे पालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर प्रताप सरनाईक ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघावर सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. प्रताप सरनाईक यांनी 2009 पासून 2024 पर्यंत निवडणुकीत विजय मिळवला. 2009 मध्ये शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला.
2014 मध्ये आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पुन्हा विजय संपादन केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही प्रताप सरनाईक यांनी विजय मिळवला. त्यामुळे प्रताप सरनाईक यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी ठरत आहे. ही फक्त त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेचीच नव्हे तर शिवसेनेच्या बळकट स्थानाची सुद्धा पावती ठरली. एक वरिष्ठ आमदार म्हणून सरनाईक नेहमीच जनहितासाठी प्रयत्नशील राहिले आहेत आणि जनतेत सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांत या भागाला कोणीही मंत्री मिळालेला नव्हता. मात्र, प्रताप सरनाईक यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर लोकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सरनाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे त्यांना मिळालेल्या या जबाबदारीबद्दल परिसरात सकारात्मक चर्चा होत आहे.
सचिन मांजरेकर, 146 विधानसभा अध्यक्ष यांनी सांगितलं की, आमदार प्रताप सरनाईक हे खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत. मिरा भाईंदर शहरात जर विकास कोणी केला असेल तर सरनाईक यांनी केला. यामध्ये विहिरींचे संवर्धन, म्युझिकल फाऊंटन, उपवन तलावाचे सुशोभिकरण, कॅशलेस रुग्णालय, टोलमाफिचे स्वप्न साकार, मिरभाईंदर मधील 1984 च्या पूर्वीच्या सर्व इमारती अधिकृत, घोडबंदर किल्ल्यावरील शिवसुष्टी,स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृह अशाप्रकारे अगणित त्यांनी कामे केली आहेत. राज्यात मिरा भाईंदर शहराला आज वेगळी ओळख निर्माण त्यांनी करून दिली आहे. आम्हाला सर्वांना अभिमान आहे की त्यांना मंत्रिपद मिळाले आहे.
पूजा आमगावकर, 146 महिला अध्यक्ष यांनी सांगितलं की, महिलांना समान सन्मान देणारे असे आमदार प्रताप सरनाईक आहेत, या शहरत विशेषतः महिलांसाठी अनेक उपक्रम राबवित आले आहेत. तसेच खऱ्या अर्थाने लोकांचं हित जपणाऱ्या नेत्यामध्ये आवर्जून प्रताप सरनाईक यांच नाव घेतलं जातं. विशेषतः महिला सक्षमीकरण आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांना विशेष स्थान निर्माण करून दिले आहे. यामध्ये लाडकी बहीण योजना याचा विशेष उल्लेख येतो.
राजेश वेतोसकर, उपविभाग प्रमुख यांनी सांगितलं की, प्रताप सरनाईक हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत, तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेषतः मिरा भाईंदरमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव त्याचप्रमाणे सर्व सामान्य मराठी संस्कृतीचा दहीहंडी सणाला जागतिक दर्जा देण्याचं काम सरनाईक यांनी केलं आहे. मिराभाईंदर शहरात प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून भविष्यात कला, क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस नक्की येतील हा आम्हाला विश्वास आहे.
शशी शर्मा, वरिष्ठ पत्रकार यांनी सांगितलं की, जो आमदार गेले सतत चार वेळा निवडून येतो तेव्हा समजायचं की जनतेचं प्रेम त्यांच्यावरती अफाट आहे. आणि जनतेचं प्रेम आहे त्यामुळे ते चार वेळा आमदार झाले आणि आज कॅबिनेट मंत्री झाले आहेत. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि त्याचीच आज पोच पावती म्हणून आज ते कॅबिनेट मंत्री आहेत.