File Photo : Chhagan Bhujbal
नवी दिल्ली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीकडे एकतर्फी सत्ता आल्यानंतर देखील सत्तास्थापनेचा दावा करण्यामध्ये देखील विलंब करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांची नाराजी उघड झाली होती. यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळ विस्तारामुळे देखील अनेक नेते नाराज आहेत. यामध्ये सध्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी आपली नाराजी उघड केली आहे. यावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे य़ांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर पक्षामध्ये सुरु असलेल्या नाराजीनाट्यावर देखील सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. “भुजबळ साहेब भुजबळ साहेब आहेत. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जेव्हा गाठीभेटी होतील, तेव्हा बोलू,” असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुढे सांगितले की छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. सुनील तटकरे म्हणाले की, “समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्याशी दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत प्रकरणावर पडदा पडेल. योग्यवेळी आम्ही त्यांना भेटू. छगन भुजबळ यांच्याशी देखील योग्य वेळी चर्चा केली जाईल. संसद आणि नागपूरचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे कसं भेटता येईल याचा प्रयत्न करू,” असे स्पष्ट मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
“ज्या ज्या वेळी पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा भुजबळ होते. सुरुवातीच्या काळात त्यांची पटेलांशी चर्चा झाली होती. लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीला मर्यादित जागा मिळाल्या. भुजबळांना नाशिकमधून लोकसभेला उभं करण्याचं दिल्लीच्या बैठकीत ठरलं. भुजबळांनी मान्य केलं. पण उमेदवारी घोषित करण्यात उशीर झाला. मी त्यावर खुलासा केला. नंतर भुजबळांनी नंतर लढणार नसल्याचं सांगितलं. लोकसभेत जागा वाटप उशीरा झालं. त्यामुळे जागा वाटप जाहीर करण्यात उशीर झाला, त्यावेळी कमी जागा मिळाल्या. विधानसभेत आम्ही जास्त जागा जिंकलो. त्यावेळी जे घडलं ते नाकारता येत नाही,” असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच नागपूरमध्ये उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. यामुळे नवीन समीकरणे दिसणार का याबाबत देखील चर्चा झाली. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, “उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटणं हा त्यांचा व्यक्तीगत अधिकार आहे. त्यावर मला टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. एकमेकांना शुभेच्छा देणं यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही,” असे सुनील तटकरे म्हणाले आहेत.