महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावर राजकारण सुरु
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे वातावरण तापले आहे. आरक्षण, महिला सुरक्षा अशा अनेक मुद्द्यांवरुन राज्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. अद्याप निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मात्र महायुती व महाविकास आघाडी प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. सर्व घटक पक्षांचा प्रचार सुरु झाला आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. उद्धव ठाकरे तर पंतप्रधान पदासाठी सुद्धा उमेदवार होते, असे म्हणत गिरीश महाजन यांनी कोपरखळी लगावली आहे.
पुन्हा महायुतीचे सरकार येईल
मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला अपेक्षित असे यश आले नाही. महाराष्ट्रामध्ये महायुतीला आणि भाजपला मोठा धक्का बसला. यामुळे आता महायुती विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार प्रयत्न आणि प्रचार करत आहे. माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. मंत्री महाजन म्हणाले, गल्लो गल्ली आता अनेक कंपनी आहेत की त्या सर्वे करतात. निकाल लागल्यावरच आपल्या समोर सर्व गोष्टी येतील. आता राजस्थान आणि छत्तीसगड येथील विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी सुद्धा या ठिकाणी भाजप येणार नाही असं सांगण्यात आलं. लटा परिणाम झाला दोन तृतीयांश एवढ्या जागा आमच्या या ठिकाणी निवडून आल्या.सर्वे म्हणजेच सगळं काही असं होत नाही. अनेक वेळेला सर्व हे चुकत असतात. महाराष्ट्रात निश्चितच पुन्हा महायुतीचे सरकार येईल यात बाबत आमच्या मनात कुठलेही शंका नाही, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
कोण मुख्यमंत्री होतं बघूयात
त्याचबरोबर राज्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पुढे कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 2019मध्ये झालेल्या विधानसभेनंतर उद्धव ठाकरे यांचे नाव अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून घोषित झाले. त्यानंतर बंडाचे राजकारण झाल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात असताना एकनाथ शिंदे यांचे नाव समोर आले. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे तर पंतप्रधान पदासाठी सुद्धा उमेदवार होते. आता तिकडे पद रिकामे झाल्याने म्हणून मुख्यमंत्री पदासाठी समोर आले. उद्धव ठाकरे यांना तर कोणत्या न कोणता खुर्चीवर बसण्याची घाई झाली आहे. तिघांमध्ये, महाविकास आघाडीत तणाव सुरू आहे. कोण मुख्यमंत्री होतं बघूयात. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमत लागेल. पण बहुमत मिळवणे आधीच महाविकास आघाडीमध्ये यांचे भांडण सुरू आहेत, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना कोपरखळी दिली आहे.