
भिगवण अपहरण प्रकरणाला नवे वळण; तरुणीने कोर्टातच व्यक्त केली 'ही' इच्छा
इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील गाजलेल्या अपहरण प्रकरणाला नवे वळण मिळाले. काही दिवसांपूर्वी बारामती सत्र न्यायालयात संबंधित तरुणीने तरुणासोबत जाण्याची भूमिका मांडली होती. मात्र, इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत तिने आपली भूमिका बदलत आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा नाट्यमय कलाटणी घेतली आहे.
बारामती सत्र न्यायालयात हजर असताना तरुणीने आईसोबत जाण्यास नकार देत संबंधित तरुणासोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तिला महिला पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते. पाच दिवस सुधारगृहात राहिल्यानंतर इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात तिची व्हीसीद्वारे सुनावणी झाली. न्यायालयाने “तुला कोणाकडे जायचे आहे?” असा थेट प्रश्न विचारला असता तरुणीने आई आणि मामाकडे जाण्याची तयारी दर्शवली.
दरम्यान, तरुणीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. “मी घरच्यांना याबाबत सांगितले होते. दुसऱ्या मुलासोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे मी स्वमर्जीने संबंधित मुलासोबत गेले,” असे तिने नमूद केले आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याचा गुन्हा खोटा असल्याचेही तिने म्हटले आहे.
तरूणीला पाठवण्यात आले पुनर्वसन केंद्रात
भिगवणमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनी श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड मार्गे महाबळेश्वरपर्यंत प्रवास केला. त्यानंतर मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. युवतीचा जबाब नोंदवून तिचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले असून, तिला पुन्हा पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले आहे. संबंधित तरुणाबाबत चौकशी सुरू असून, पुढील निर्णय तपासानंतर घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेदेखील वाचा : Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”
काय आहे नेमकं प्रकरण?
लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत मंगळवारी तरुणी गेली होती. यावेळी दोन तरुणांनी तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून तीच अपहरण केल्याचे सांगण्यात आलं होतं. आता या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट आलं आहे. मुलीने स्वतः व्हिडीओ बनवून याबाबतची माहिती दिली. माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबध आहेत, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचे तिने व्हिडिओत म्हटलं आहे.