
गोव्याचा पालोलेम समुद्रकिनारा आशियात अव्वल! जागतिक स्तरावर सहावे स्थान, अर्धचंद्राकार खाडी, पांढरीशुभ्र वाळू
Mumbai News: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेली कामगिरी समोर आली आहे. दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध पालोलेम समुद्रकिनाऱ्याने आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्याचा मान मिळवला असून, जागतिक स्तरावरील पहिल्या २५ समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत सहावे स्थान पटकावले आहे. ‘बीच डॉट कॉम’च्या जागतिक समुद्रकिनारा निर्देशांक २०२६ मध्ये पालोलेमचा समावेश झाला आहे. गोवा पर्यटन विभागाने रविवारी ही माहिती दिली.(फोटो सौजन्य – istock)
जगातील पहिल्या २५ समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवणारा पालोलेम हा आशियातील एकमेव समुद्रकिनारा ठरला आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात असलेला पालोलेम समुद्रकिनारा आपल्या अर्धचंद्राकार खाडी, पांढऱ्याशुभ्र वाळू, नारळाच्या झाडांच्या रांगा आणि तुलनेने शांत समुद्राच्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन ए. खौटे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही ओळख गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि पर्यटकांना मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांची पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बीच डॉट कॉम’च्या २०२६ च्या जागतिक समुद्रकिनारा निर्देशांकासाठी १८ विविध निकषांचा आधार घेण्यात आला. यामध्ये पर्यटन लोकप्रियता, पर्यटकांची मते, समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचण्याची सुविधा आणि हवामान यांचा समावेश होता. तसेच तज्ज्ञांच्या शिफारशी, पर्यटकांची समीक्षा आणि समुद्राच्या पाण्याचा रंग व स्वच्छतेसंदर्भात अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या आकडेवारीचाही विचार करण्यात आला.
पालोलेम समुद्रकिनाऱ्यावर पोहणे, कयाकिंग, डॉल्फिन पाहण्यासाठी नौकाविहार आणि परिसरातील बॅकवॉटरची सफर अशा विविध पर्यटन उपक्रमांचा आनंद घेता येतो. किनारी गावांमधील खाद्यसंस्कृती, स्थानिक खानपान आणि आरोग्यविषयक सुविधाही पर्यटकांना आकर्षित करतात.
या जागतिक मानांकनामुळे दक्षिण गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा पर्यटन विभागाने व्यक्त केली आहे. समुद्रकिनाऱ्यांसोबतच गोव्याच्या अंतर्गत भागातील निसर्गसंपदा, ऐतिहासिक वारसा, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि आध्यात्मिक पर्यटनाकडेही आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे लक्ष वेधण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.