गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध 'इतक्या' रुपयांनी महागले
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे दूध संस्था व संस्था कर्मचारी सक्षम व्हावेत आणि दुग्ध व्यवसाय अधिक बळकट व्हावा, यासाठी गोकुळ सातत्याने नवे निर्णय घेत असतो. त्यात आता कंपनीने म्हैस-गायीचे दूध एक रुपयाने महागले आहे.
दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने संघाशी संलग्न म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढवण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने दरवाढ केली आहे. सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर एक रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफसाठी प्रतिलिटर रुपये ५०.५० वरून रूपये ५१.५० करण्यात आला आहे.
तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफसाठी प्रतिलिटर रूपये ५४.८० वरून रूपये ५५.८० करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफसाठी प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३२ रूपये वरून ३३ रूपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी जवळ-जवळ साडे चार ते पाच कोटीचा जादाचा दर मिळणार आहे. सद्य:स्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही.
प्राथमिक दूध संस्था संघाचा आधारभूत घटक असून, सध्या इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य दर आणि मजुरांचे पगार वाढलेले आहेत व सध्याच्या महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सध्या देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी, अशी संस्थांचालकाकडून वारंवार मागणी होत होती. यानुसार दूध संस्थेच्या संकलनानुसार अनुदानात रक्कमेत ८ ते १० हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.