
जानेवारीच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावत सर्वांना अवाक् केलं आहे
01 Jan 2026 01:45 PM (IST)
मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये सीएसएमटी स्थानकातील प्रवासी संख्या ४२ कोटी होती. तीच आता २०२५-२६ (ऑक्टोबरपर्यंत) २४ कोटींवर घसरली आहे. हीच परिस्थिती मध्य रेल्वेच्या प्रमुख १० रेल्वे स्थानकातील आहे. तरीदेखील सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरच्या वेळी लोकलला प्रचंड गर्दी पहायला मिळत असल्याने प्रवासी संख्या घटली तरी गर्दी कायम कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
01 Jan 2026 01:35 PM (IST)
नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली. परंतु, अमेरिकन डॉलरमध्ये वाढ आणि नफा बुकिंगमुळे सकाळच्या व्यवहारात एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीत देखील घसरण झाली. तथापि, यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी कपात होण्याची अपेक्षा असल्याने नुकसान मर्यादित झाले आणि काही स्थिरता राखली गेली. भारतात सुरुवातीच्या व्यापारात, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १३,५०६ रु. होती, जी कालच्या तुलनेत १७ रुपयांनी वाढली आहे. दरम्यान, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२,३८० रु. होती, जी १५ रुपयांनी वाढली आहे. १८ कॅरेट सोन्याची (९९९ सोने) किंमत प्रति ग्रॅम १०,१२९ रु. वर राहिली, जी १२ रुपयांनी वाढल्याचे दिसून येते.
01 Jan 2026 01:25 PM (IST)
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. महापालिका निवडणूका जाहीर झाल्या असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून पक्षाने उमेदवारी न दिलेले इच्छुक प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. दरम्यान, मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जोरदार प्रचाराला लागले आहे. मुंबईसह राज्यामध्ये ठाकरे बंधूंचा आवाज घुमणार आहे. नाशिकमध्ये दोन्ही ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) एकत्रित सभा होणार आहेत.
01 Jan 2026 01:15 PM (IST)
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा “इक्कीस” हा चित्रपट युद्ध संपते, पण त्यामागील कथा कधीच संपत नाही याचे उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटामध्ये शौर्य, एखाद्याला गमावण्याचे दुःख, जबाबदारी आणि आठवणींचा शोध हे सगळे दाखवण्यात आलं आहे. जड संवाद किंवा कोणतेही ढोंग न करता, हा चित्रपट थेट हृदयापर्यंत पोहचणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, या चित्रपटामध्ये कोणाही गोंधळ नाही उलट शांतपणे या चित्रपटांने त्याचा संदेश दिला आहे. चाहत्यांना हा चित्रपट नक्की आवडणार आहे.
01 Jan 2026 01:05 PM (IST)
नवीन वर्ष २०२६ च्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज असताना, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पुन्हा एकदा आपल्या तांत्रिक कौशल्याने जगाला थक्क केले आहे. दुबईतील आयकॉनिक बुर्ज खलिफा (Burj Khalifa) आणि अबु धाबीतील शेख झायेद फेस्टिव्हलमध्ये झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याने जागतिक विक्रमांची नवीन शिखरे सर केली आहेत. मध्यरात्रीचे १२ ठोके पडताच, वाळवंटातील हे शहर रोषणाईने अक्षरशः न्हाऊन निघाले होते.
01 Jan 2026 12:55 PM (IST)
बीडच्या माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर गावातील किराणा दुकानदार व ट्रॅक्टर चालकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दोन्ही आरोपी अटकेत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
01 Jan 2026 12:50 PM (IST)
धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी माहिती नमूद दिल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला होता. यावर परळी कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. करुणा मुंडे यांनी केलेली तक्रार परळी कोर्टाने फेटाळून लावल्याचे समोर येत आहे.
01 Jan 2026 12:40 PM (IST)
गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. अपघाताचा बनाव करून मृतदेह पुलाखाली फेकला, मात्र रक्ताच्या ठशांमुळे पोलिसांनी हत्येचा पर्दाफाश केला.
01 Jan 2026 12:35 PM (IST)
बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले. रहमानला २०२६ च्या आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
01 Jan 2026 12:30 PM (IST)
जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये साई गणेश बोराडे या तरुणावर सिनेस्टाईल पाठलाग करून छातीवर चाकूने हल्ला झाला. नागरिकांनी आरोपी शुभम सोनवणेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. साई गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
01 Jan 2026 12:25 PM (IST)
शिवसेनेकडून प्रभाग एकमध्ये नयना रामवंशी, गणेश चव्हाण, उर्मिला निरगुडे, प्रवीण जाधव यांना संधी देण्यात आली. प्रभाग दोनमधून अश्विनी बागूल, कविता अंडे, रामभाऊ जाधव, भाऊसाहेब निमसे, प्रभाग तीन मध्ये पुनम मोगरे आणि हर्षद पटेल हे निवडणूक लढवतील. प्रभाग चारमध्ये कविता कर्डक, सविता जाधव, सचिन ढिकले, सतनाम राजपूत, प्रभाग पाचमध्ये कमलेश बोडके, रागिणी तांबे, मंदाकिनी वाघ, प्रभाग सहामध्ये दामोदर मानकर, सुनिता पिंगळे, प्रमोद पालवे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
01 Jan 2026 12:20 PM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागिरदारवर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या जहागिरदारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शहरात तणाव आहे.
01 Jan 2026 12:16 PM (IST)
पुण्यामध्ये शिवसेनेने पद्मावती-सहकारनगर प्रभाग क्रमांक 36 मध्ये दोघांना उमेदवारी दिल्याने वाद निर्माण झाला. यामध्ये एकाने दुसऱ्याचा फॉर्म फाडून गिळून टाकला.
01 Jan 2026 12:10 PM (IST)
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा गावात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
01 Jan 2026 12:03 PM (IST)
देशाने २०२६ या नवीन वर्षात कडाक्याच्या थंडीत प्रवेश केला. देशाच्या मोठ्या भागात थंडीच्या लाटा, दाट धुके आणि तापमानात तीव्र घट नोंदवली गेली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) राष्ट्रीय आणि प्रादेशिक अहवालांनुसार, पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा आहे.
01 Jan 2026 11:55 AM (IST)
"कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होत आहे. त्यावर संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया दिली. हे आरोप नाही तर सत्य आहे. मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. विधानसभेचे अध्यक्ष यांच्यासाठी नियम, संकेत आहेत की त्यांनी अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं. मी ते पाहिलं की, कमळाबाईचं उपरणं टाकून त्यांच्या घरातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी ते गेले. त्याठिकाणी त्यांनी विरोधकांना धमकावले. या राज्यात काय चाललंय याची विचारण्याचीच सोय उरली नाही," असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
01 Jan 2026 11:45 AM (IST)
महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असूनही पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने चक्क डुप्लीकेट एबी फॉर्म जोडून अर्ज केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉर्ड क्रमांत 173 मधून शिल्पा केळुसकर यांनी त्यांच्या अर्जासोबत चक्क डुप्लीकेट एबी फॉर्म जोडला आणि त्यासह हा अर्ज सादर केलं. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच एकच खळबळ माजली. मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी याप्रकरणी तातडीने पावलं उचलत निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली. उमेदवाराने डुप्लीकेट फॉर्म जोडल्याचे नमूद करत त्यांनी हा एबी फॉर्म रद्द करण्याचीही मागणी केली.
01 Jan 2026 11:35 AM (IST)
मध्य रेल्वेने १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.०० वाजता सीएसएमटी येथे पारंपरिक हॉर्न वाजवून नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि पुढील प्रवास सुखकर असो असा संदेश दिला. यावेळी प्रवाशांनी देखील आनंद व्यक्त करत नवीन वर्षाचे स्वागत केले.
Central Railway celebrates new year at CSMT with customary horns at 00.00 of 1 January 2026.
Happy New Year and Safe Journey Ahead to all. pic.twitter.com/1D5le7pQpD— Central Railway (@Central_Railway) December 31, 2025
01 Jan 2026 11:25 AM (IST)
मध्य प्रदेशमधील इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात २५ डिसेंबर रोजी सांडपाणी मिसळलेले पाणी नळांमध्ये आल्यानंतर अतिसार आणि उलट्यांमुळे किमान सात लोकांचा मृत्यू झाला, तर २७ रुग्णालयांमध्ये १६२ जणांना दाखल करण्यात आले. शहराच्या खासदारांनी एनडीटीव्हीचे अनुराग द्वारी यांच्या परतावा आणि मदतीसंबंधीच्या प्रश्नांना 'फुकटचे प्रश्न' म्हणून फेटाळून लावले, ज्यामुळे पत्रकार आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. नंतर विजयवर्गीय यांनी घटनास्थळी भेट दिली, अधिकाऱ्यांच्या चुका मान्य केल्या आणि परिस्थिती सुधारू लागल्यावर प्रत्येक कुटुंबाला २ लाख रुपये, मोफत उपचार आणि स्वच्छ पाण्याची सोय असलेले टँकर देण्याचे आश्वासन दिले.
01 Jan 2026 11:15 AM (IST)
एकाच प्रभागात शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या एका उमेदवाराने दुसऱ्याचा फॉर्म हिसकावून घेत फाडून खाऊन टाकला. फॉर्म खाऊन टाकणाऱ्या उद्धव लहू कांबळे (शिवसेना उमेदवार) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
01 Jan 2026 11:05 AM (IST)
स्त्रीच्या हातामध्ये पाटी पुस्तक देणाऱ्या जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आजच्या दिवशी देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात फुले दाम्पत्यांनी ही शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः मुलींना शिक्षणाचे धडे दिले. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि समाजात स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.
01 Jan 2026 10:59 AM (IST)
२०२६ च्या पहिल्याच दिवशी संपूर्ण जगाचे लक्ष रशियाकडे लागले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेन युद्धाबाबत अत्यंत आक्रमक आणि निर्णायक भूमिका मांडली आहे. “युक्रेनसोबत सुरू असलेले हे युद्ध केवळ रशियाच्या अंतिम विजयानेच संपेल,” असा दावा करत पुतिन यांनी पाश्चात्य देशांना आणि युक्रेनला स्पष्ट संकेत दिले आहेत. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटकापासून सुरू झालेला हा संदेश आता जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
01 Jan 2026 10:54 AM (IST)
जळगाव येथून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सिनेस्टाइल पाठलाग करून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या छातीवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. यात तरुण गंभीर झखमी झाला. साई बोराडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गोलाणी मार्केटमध्ये घडली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने संशयितांना नागरिकांनी पकडून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित आरोपीचे नाव शुभम सोनवणे असे आहे. जळगाव महापालीकेत उमेदवारांना अर्जाची छाननी सुरु असतांना बाजूच्या मार्केटमध्ये हल्ला झाल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाली होते.
01 Jan 2026 10:50 AM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू कुलदीप यादवने नवीन वर्षाची सुरुवात त्याच्या प्रेयसीसोबत केली. कुलदीपने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला त्याच्या मंगेतरासोबतचे एक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. नवीन वर्षाच्या आधी, कुलदीपने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याची भावी पत्नी वंशिकासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “तुमच्यासोबत २०२६.” कुलदीप यादव आणि वंशिकाचे जून २०२५ मध्ये साखरपुडा झाला आहे लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत अशी माहिती समोर आली होती.
01 Jan 2026 10:43 AM (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातून एक धक्कदायक घटना घडली आहे. पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ही हत्या अपघात वाटावी म्हणून त्यांनी मृतदेह पुलाखाली फेकला. मात्र पोलीस तपासात हा बनाव उलगडला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हत्या झालेल्या पतीचे नाव देवानंद सूर्यभान डोंगरवार असे आहे. तर आरोपीचे नाव रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे असे आहे.
01 Jan 2026 10:36 AM (IST)
विजय हजारे ट्रॉफीचे सामने सध्या सुरू आहेत, अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेचा भाग आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सरफराज खानच्या धमाकेदार शतकामुळे मुंबईने गोव्याचा ८७ धावांनी पराभव केला. सरफराज खानने ७५ चेंडूत नऊ चौकार आणि १४ षटकारांसह १५७ धावा केल्या. त्याचा भाऊ मुशीर खाननेही ६६ चेंडूत ६० धावा केल्या. हार्दिक तोमर (५३) ने अर्धशतक झळकावले. कर्णधार शार्दुल ठाकूरने ८ चेंडूत २७ धावा केल्या. मुंबईने ५० षटकांत ८ गडी गमावून ४४४ धावा केल्या.
01 Jan 2026 10:29 AM (IST)
लोकप्रिय टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी त्याच्या पत्नीसोबत दुबईमध्ये सुट्टी साजरी करत होता. तो ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तिथे गेला होते. आणि अशातच आता, बातमी समोर आली आहे की हे जोडपे ट्रिप सोडून मुंबईला परतले आहे. अर्जुन बिजलानीचे सासरे रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची तब्येत अचानक बिघडली असल्याचे समजले आहे. परंतु, अभिनेत्याच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.
01 Jan 2026 10:21 AM (IST)
श्रीराम राघवन दिग्दर्शित “अगस्त्य नंदा” आणि धर्मेंद्र यांच्या “इक्कीस” चित्रपटातही सीबीएफसीने काही संवादावर कात्री चालवली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने निर्धारित कट आणि बदल केल्यानंतर या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मॅडॉक फिल्म्स निर्मित, हा चित्रपट ख्रिसमस रिलीजपासून १ जानेवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
01 Jan 2026 10:18 AM (IST)
येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वासुदेवांच्या माध्यमातून मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील विविध भागांत वासुदेवांनी फेरी काढत लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. “लोकशाहीचा सण साजरा करूया, मतदान करून आपला हक्क बजावूया” असा संदेश देत वासुदेवांनी नागरिकांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. या अभिनव उपक्रमामुळे सकाळच्या वेळेत नागरिकांचे विशेष लक्ष वेधले आहे.
01 Jan 2026 10:16 AM (IST)
नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वर्षाच्या अखेरच्या क्षणी, रात्री बारा वाजता साईंच्या जयघोषात हजारो भाविकांनी नवीन वर्षाचे स्वागत करत साईसमाधीचं दर्शन घेतलंय. साईसमाधी मंदिर, द्वारकामाई परिसर आणि संपूर्ण शिर्डी परिसर साईनामाच्या गजराने अक्षरशः दणाणून गेल्याचं दिसून आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत नववर्षाची सुरुवात केली. विशेष म्हणजे, अलिकडच्या काळात नव्या पिढीकडून थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन पब आणि डिस्कोमध्ये करण्याकडे कल वाढताना दिसतो. मात्र त्याच बरोबर शिर्डीत मोठ्या संख्येने तरुण-तरुणी साईमंदिरात उपस्थित राहून साईनामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात नववर्ष साजरे करताना दिसून आल्याय. भाविकांनी साईबाबांकडे सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करत नवीन वर्षाची सुरुवात केली. या भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणामुळे शिर्डी पुन्हा एकदा श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्रबिंदू ठरल्याचे चित्र दिसून आलंय.
मुंबईत नववर्षाचं जल्लोषात स्वागत लोकांनी केलं आहे. दरम्यान नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावत नववर्ष साजरं केलंय. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पहाटे पावसाच्या सरी बरसल्या आहेत. याशिवाय विरार, अंबरनाथ, घाटकोपर, मुलुंड इथेदेखील पावसाने हजेरी लावली आहे. बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी भागात मध्यम सरी सकाळी बरसल्या. जानेवारी महिन्यात अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले. नवी मुंबईतदेखील पावसाने हजेरी लावली.