हॉलमार्कसाठी वेगवेगळ्या दुकानांमधून आलेले तब्बल २१ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेणार्या टोळीचा फरासखाना पोलिसांनी अवघ्या बारा तासात पर्दाफाश केला. त्यांना माळशिरस भागातून अटक करत १३ लाख ४९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
पुणे : हॉलमार्कसाठी वेगवेगळ्या दुकानांमधून आलेले तब्बल २१ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेणार्या टोळीचा फरासखाना पोलिसांनी अवघ्या बारा तासात पर्दाफाश केला. त्यांना माळशिरस भागातून अटक करत १३ लाख ४९ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे, दुकानात काम करणार्या कामगाराने साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
लकी दत्तात्रय मोहीते (वय १९ रा. वांगी, सांगली), सचिन मोहन दडस (वय २४ रा. आटपाडी, जि. सांगली), विशाल भागवत गोसावी (वय २१ रा. इंदापुर), अतुल दत्तात्रय क्षीरसागर (वय २९ रा. माळशिरस, सोलापूर), सुरज भगवान महाजन (वय-२७ रा. माळशिरस सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस अंमलदार मेहबूब मोकाशी, गौस मुलाणी, प्रमोद मोहीते, समीर माळवदकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
गेल्या आठवड्यात बुधवारी (दि.१) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेश पेठेतील न्यू त्रिशूल हॉलमार्कींग सेंटर दुकानात अज्ञातांनी घुसून चोरी केली होती. याबाबत ४८ वर्षीय महिलेने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारदारांचे त्रिशूल हॉलमार्किंग सेंटर आहे. त्याठिकाणी शहरातील वेगवेगळ्या सराफ दुकानातून दागिने हॉलमार्कसाठी येतात.
दरम्यान, बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हॉलमार्कसाठी आलेले २१ तोळे दागिने चोरुन नेले. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेत तकार दिली होती. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी तपास सुरू केला होता.
सीसीटीव्हीची पडताळणी केली. तर तांत्रिक तपास केला असता, आरोपी माळशिरस भागात असल्याचे समजले. त्यानूसार पथक माळशिरस भागात पोहचले. त्यावेळी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करुन बारा तासात गुन्हा उघडकीस आणला. आरोपी लकी हा तक्रारदार यांच्या दुकानात कामाला आहे. त्याने याच दुकानात यापूर्वी काम करणार्या दडस व गोसावी यांच्याशी संगनमत करुन दुकानात चोरी करण्याचा प्लॅन केल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Gold jewelery smuggling gang busted faraskhana police strike action nrdm