पुण्याहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग; परिसरात एकच खळबळ
उंब्रज : पुण्याहून कराडच्या दिशेने बंगळूर-मुंबई महामार्गावरून जाणाऱ्या मालट्रकच्या (MH 04 LQ 6816) केबिनने अचानक पेट घेतला. त्यामुळे उंब्रज परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ट्रकच्या केबिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच कराड अर्बन बँकेच्या उंब्रज शाखेतील प्रशासन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचे फायर सिलिंडर वापरून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच पाण्याचा पुरवठा सुरू करून आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
दरम्यान, आग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे लक्षात येताच साई राजअर्थ मूव्हर्स व वॉटर सप्लायरचा पाण्याचा टँकरही तातडीने घटनास्थळी दाखल झाला. टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. स्थानिक युवक व नागरिकांनीही धाडसाने पुढे येत मदतकार्य केले. या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ
महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने आग विझवताना तसेच वाहतूक सुरळीत ठेवताना प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र नागरिक, युवक, कराड अर्बन बँकेचे अधिकारी-कर्मचारी, पाण्याचा टँकर चालक आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
मालट्रकची केबिन जळून खाक
आगीच्या तीव्रतेमुळे मालट्रकची केबिन मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण आणि ट्रकमधील मालाचे झालेले नुकसान याबाबत संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि विविध घटकांनी केलेले तातडीचे मदतकार्य यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.






