कल्याण : गौरीपाडा गावची स्मशानभूमी हटवून त्या जागेवर नविन पाणीपुरवठा प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या जागेची मोजणी सुरु केली आहे. मात्र स्मशानभूमी हटवण्याआधी नवीन स्मशानभूमी बांधून द्यावी अन्यथा विद्यमान स्मशानभूमी हटवण्यास ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
गुरुवारी सकाळी मनपाचे कर्मचारी या जमिनीची मोजणी करण्यासाठी आले होते. गौरीपाडा ग्रामस्थांनी आधी नविन स्मशानभूमी बांधा मगच मोजणी करा अशी भुमिका मांडली. यापूर्वीही सीटीपार्कसाठी ग्रामस्थांनी खाजगी जमीनी दिल्या आहेत. मात्र त्याचा मोबदला अद्याप महानगरपालिकेने दिला नाही असेही ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत भाजप कल्याण विधानसभा संयोजक तथा गौरीपाडा ग्रामस्थ अर्जुन म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही विकासाला विरोध करत नाही. काम पुर्ण झाल्यावर मनपाचे अधिकारी दुर्लक्ष करतात म्हणून आधी नवी स्मशानभूमी बांधून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी रास्त असल्याचे त्यांनी सांगितले. तर आंम्ही केवळ सर्वेक्षण करण्यासाठी आलो आहोत. स्मशान हटवण्यासाठी नाही. गरज भासली तरच स्मशानभूमी इतरत्र हलवणयाचा विचार होईल. पण ग्रामस्थ सर्वेक्षण करु देत नसल्याचे केडीएमसी सर्वेक्षण अधिकारी प्रमोद मोरे यांनी सांगितले.