Ajit Pawar Solapur Visit:
Solapur News : मोहोळ परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून कार्यवाही करावी, तसेच सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठवावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बुधवार (२४ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील पुलावर पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.
Marathwada Rain: “सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधावर…”; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?
सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसंच झालेल्या नुकसानीची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश अजित दादा पवार यांनी दिले. शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो एकर शेती आणि लोकांची घरं पाण्याखाली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा सुरु केला आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर आपल्या नुकसानीचा पाढा वाचला. तसेच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी केली.
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समवेत मोहोळचे माजी आमदार तथा विद्यमान राज्यमंत्री राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील, मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे, माजी आमदार यशवंत माने यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान मोहोळ तालुक्यातील घाटणे कारंडे वस्ती येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबीयांना मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखालील मोहोळ पोलीस ठाण्याच्या रेस्क्यू टिम ने सुखरूप सुरक्षित ठिकाणी हलवले. मोहोळ तालुक्यात उदभवलेल्या न भूतो न भविष्यते पूर परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व प्रशासन योग्य समन्वय ठेवून बचाव कार्य करत आहे.
मोहोळ येथील लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच हॉटेल लोकसेवा यांच्या वतीनेही बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदतकार्य पोहोच केले तसेच त्यांना औषध गोळ्याचे वाटपही केले. मोहोळ येथील छोटे-मोठे व्यावसायिक व किराणा दुकानदार यांनीही पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.