
सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो
हा पाच दिवसांचा धार्मिक सोहळा उत्साहात व भक्तिभावाने पार पाडण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने व्यापक तयारी केली असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत केले.
Maharashtra Politics: “दुश्मनी केली तर ती…”; कॉँग्रेसविरुद्ध धडाडली एकनाथ शिंदेंची तोफ
12 जानेवारी – तैलाभिषेक (यण्णीमज्जन)
13 जानेवारी – संमतीभोगी (नंदीध्वजांचा अक्षता सोहळा)
14 जानेवारी – मकरसंक्रांत (होमप्रदीपन)
15 जानेवारी – किंक्रांत (शोभेचे दारूकाम व ड्रोन लाईट शो)
16 जानेवारी – कप्पडकळी (नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन)
परंपरेनुसार मानाचे सात नंदीध्वज हे श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक मानले जातात. 12 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू मठातून पालखीसह सवाद्य मिरवणूक निघून शहरातील पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक केला जाणार आहे. हे सात नंदीध्वज सामाजिक समता व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानले जातात.
13 जानेवारी रोजी नंदीध्वजांच्या मिरवणूक मार्गावर संस्कारभारतीच्या कार्यकर्त्यांकडून सुमारे 3 किमी अंतरावर रांगोळीची भव्य पायघडी अंथरण्यात येणार आहे.
14 जानेवारी रोजी सायंकाळी होमप्रदीपन होणार असून, 15 जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम, आतषबाजी आणि सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सादर होणारा सुमारे 300 ड्रोनचा भव्य ड्रोन लाईट शो हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे जीवनकार्य व सोलापूरचा अध्यात्मिक वारसा आकाशात साकारला जाणार आहे.
यात्राकाळात विजापूर रोड परिसरात पशुबाजार भरविण्यात येणार असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातून शेतकरी सहभागी होणार आहेत. यासोबतच नुकतेच पार पडलेले 55 वे राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसर, होम मैदान व गड्डा परिसरात 70 हून अधिक CCTV कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची नेमणूक व अपघात विमा संरक्षण देण्यात आले आहे. यात्रेतील प्रमुख कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाहिन्यांवर व आकाशवाणी सोलापूरवरून करण्यात येणार आहे.
श्री सिद्धरामेश्वर महाराजांची ही परंपरागत यात्रा गेल्या 900 वर्षांपासून अखंड सुरू असून, सर्व भाविकांनी दर्शन घेऊन यात्रेचा आनंद घ्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीने केले आहे.