सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे खासदार निलेश लंकेकडून स्वागत
Ahilyanagar News: १७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना वगळले! महायुती सरकारबाबत महिलांमध्ये नाराजी
सिस्पे घोटाळा उघडकीस आल्यानंतर आपण काही ठेवीदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती, असे सांगत खासदार लंके म्हणाले की, हा विषय कधीही राजकीय न करता केवळ ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देणे हीच आपली भूमिका राहिली आहे. मात्र विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात असून राजकीय आकसापोटी आपल्यावर बोट दाखवले जात आहे. स्वतःचे दोष झाकून ठेवून दुसऱ्यांवर आरोप करण्याची सवय काही लोकांना असल्याची टीका करत त्यांनी नाव न घेता विखे पाटलांवर निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, सिस्पे प्रकरण अतिशय गंभीर आहे. मात्र जेव्हा केंद्रीय मंत्री लोणी किंवा कोपरगावच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांना सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवेदन का दिले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नगर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्ते घोटाळ्यावर एक शब्दही न बोलल्याची टीका खासदार लंके यांनी केली. जिल्ह्यात दहा लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आले असून या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने शिर्डीसह इतर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असून सुमारे 300 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. याशिवाय शेवगाव येथे शेअर मार्केटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून या दोन्ही प्रकरणांची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. पोलिसांवरच नागरिकांचा विश्वास नसेल, तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिरपे-इन्फिनिटी घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे खासदार लंके यांनी ठामपणे स्पष्ट केले. केवळ इन्फिनिटीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो म्हणून जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून हा राजकीय हेतूने चालवलेला खोटा प्रचार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या उद्घाटन कार्यक्रमाला विविध पक्षांचे आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी कोणालाही पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त केलेले नसून उलट ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाणीवपूर्वक दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप करत काही ठिकाणी धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीचा विचार महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून नगर शहराने शांतता, विकास आणि पारदर्शक प्रशासनासाठी या विचारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही खासदार निलेश लंके यांनी केले.






