उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो- यूट्यूब)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात सभा
15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार
शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Eknath Shinde: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापुरात सभा घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या सभेत म्हणाले, “आजच्या सभेला मोठ्या गर्दीने लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. म्हणूनच मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला, त्या उमेदवाराचा मतपेटीत नंबर पहिला. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आहे. तसाच चमत्कार कोल्हापूर महानगरपालिकेत दाखवायचा आहे. महायुती म्हणून आपण इथे लढतोय. येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर आपल्याला महयुतीचाच झेंडा फडकावयचा आहे. समोरची गर्दी पाहून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे.”
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आजची सभा प्रचारसभा आहे, मात्र त्या सोबतच ही विजयाची सभा आहे. महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. मैत्री केली तर जीवाला जीव देणारी, दुश्मनी केली तर ती समोरासमोर अशी कोल्हापूरकरांची ओळख आहे. काही लोक स्वतःला मालक समजतात तर समोरच्यांना नोकर समजतात. मात्र जनता मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत. जनतेचा नाद कोणी करायचा नाही.”
“कोल्हापूरकरांनी कॉँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा 15 वर्षांचा वनवास सहन केला. विकास घडवायचा आहे, परिवर्तन करायचं आहे, तर महायुतीशिवाय पर्याय नाही. यावेळेस बदल करायचा असे कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. प्रिंटिंग मिसटेक म्हणणारे नाही. चुनावी जुमला करणारे आम्ही नाही. कोल्हापूरकर प्रेमळ आहेत. दिलेला शब्द पाळणारे आहे. आपत्ती तिथे आम्ही, आपत्ती तिथे महायुती, आपत्ती तिथे महायुती. फेसबुक लाईव्ह करणे आणि फेस टू फेस काम करणारे आम्ही लोक आहोत. आम्ही झोपा काढयला नाही तर विरोधकांच्या झोपा उडवायला आलो आहोत.या 15 तारखेला विरोधकांच्या झोपा उडवायच्या आहेत. आज कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्यासुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतोय”, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांचे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मीनाक्षी शिंदे यांचे एक कार्यकर्ते मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांना निवडणुकीसाठी मदत करत असल्याने, मीनाक्षी शिंदे यांनी त्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमक्या दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.






