Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश
म्हसवड : म्हसवड शहरात शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने म्हसवड एस. टी. बस स्थानक ते शिंगणापुर चौक या दरम्यान असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करताना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधताना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर ज्या घरांची पडझड झाली, त्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश देत संबधितांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.
म्हसवड शहरात शनिवारी पहाटे झालेल्या पावसाने जे नुकसान झाले ते नेमके कशामुळे झाले याची संपूर्ण माहिती पालकमंत्री देसाई यांनी स्थानिकांकडून घेतली. तर म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे याबाबत विचारणा करताना या परिसरातील गटारांचे नुतनीकरणाचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश दिला. तर सदरचा रस्ता हा केंद्राकडे जरी असला तरी मी व माणचे नेते जयकुमार गोरे आम्ही दोघे मिळुन केंद्राकडुन यासाठी विशेष निधी उपलब्ध करुन घेतो. आपण काळजी करु नका, असा आश्वासक शब्द म्हसवडकर जनतेला दिला.
हेदेखील वाचा : Shambhuraj Desai News: आईच्या वाढदिवशी शासकीय बंगल्यात गृहप्रवेश; शंभूराज देसाईचं ‘मेघदुत’शी आहे खास नातं?
पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले की, मी याठिकाणी येण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतालाही भेटी दिलेल्या आहेत. त्यांचेही पंचनामे प्रशासनाकडुन करण्यात आलेले आहेत. ते सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागावुन घेऊ तर या पावसात ज्या दुकानदारांचे, शेतकऱ्यांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. या सर्वांना नक्की शासकीय मदत मिळेल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
तसेच, म्हसवड येथील आंबेडकर नगर याठिकाणी ३ घरांच्या पडझडी झाल्या असून, अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचे पत्रकारांनी विचारले असता मी आताच प्रातांधिकाऱ्यांना या पडझडीचे पंचनामे करण्याचे आदेश देत असल्याचे सांगत त्या कुटुंबानाही मदत मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री देसाई यांनी दिले.
यावेळी प्रातांधिकारी उज्वला गाडेकर, तहसिलदार विकास अहिरे, अपर तहसिलदार मीना बाबर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे या सह प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना, शेतकरी सेनेचे कृषीरत्न विश्वंबर बाबर, तालुका बाळासाहेब मुलाणी, शहर प्रमुख वैभव गुरव आदी उपस्थित होते.