मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानात गुटख्याचा कारखाना सुरू कऱण्यास मदत केल्याचा आरोपाखाली महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) मुंबईतील विशेष न्यायालयाने गुटखा व्यापारी जे.एम जोशी यांच्यासह आरोपी जमिरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी उर्फ फारुख तालका यांना दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा सुनावली तर ५ लाखांचा दंडही ठोठावला.
गोवा गुटखा मालक जे. एम. जोशी यांच्यासह माणिकचंद गुटखा मालक रायकलाल धारिवाल हे देखील आरोपी होते, परंतु त्यांचे निधन झाल्याने त्यांच्यावरील खटला थांबवण्यात आला आहे. दाऊदने २००२ मध्ये पाकिस्तानमध्ये गुटखा उत्पादन स्थापन करण्यासाठी दोन्ही गुटखा मालकांकडे मदत मागितली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, उत्पादन कंपनीला “फायर गुटखा कंपनी” असे संबोधले जाणार होते त्यावेळी जोशी यांनी कथितपणे जबाबदारी घेऊन प्लांट कार्यान्वित करण्यासाठी यंत्रसामग्रीच्यामार्फत मदत करून कथितरित्या, २.६४ लाख लाख रुपये किंमतीची पाच मशीन दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवली होती. असा दावाही सीबीआयने केला होता.
मात्र, पुढे धारिवाल आणि जोशी यांच्यात पैशांवरून वाद झाला आणि जोशी यांनी गोवा गुटखा सुरू केला होता. अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी दिली. मात्र, जोशीं यांनी लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि कोट्यवधी रुपयांचा महसूलही सरकारला मिळवून दिला होता. तसेच त्यांची इतर कोणतिही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, असा दावा करत त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती जोशी यांच्यावतीने अँड. सुदीप पासबोला यांनी केली. मात्र, जोशींच्याविरोधात दाखल गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे असून जोशींना जीवाची भीती वाटत होती तर त्यांनी दाऊदऐवजी पोलिसांकडे मदत मागणे अपेक्षित होते, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश बी.डी.शेळके यांनी जोशी यांच्यासह आरोपी जमिरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी उर्फ फारुख तालका यांना दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा सुनावली तर ५ लाखांचा दंडही ठोठावला.