बारामती/ अमोल तोरणे : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने युद्ध पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापुरात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे हेच उमेदवार असतील, असे संकेत दिले आहेत, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापुरातून हर्षवर्धन पाटील भाजपमधून बंड करून अपक्ष अथवा इंदापूर तालुका विकास आघाडी कडून लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपमधून हर्षवर्धन पाटील यांचे बंड अटळ असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला नाराज असणारे हर्षवर्धन पाटील यांची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर करून अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांची दिलजमाई घडवून आणली होती. आगामी इंदापूर विधानसभा मतदारसंघाची महायुतीची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी भाजपला देण्याचे आश्वासन अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे स्पष्टीकरण स्वतः पाटील यांनी माध्यमांना दिले होते. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात खडकवासला मतदारसंघ वगळता सर्वच मतदारसंघांमध्ये मतदारांनी कौल दिल्याने महायुतीच्या नेत्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. दरम्यान इंदापुरातून सुप्रिया सुळे यांना २५ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना दीड लाखाहून अधिक मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष घातले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पाटील यांच्या समर्थकांनी इंदापूर तालुका विकास आघाडीचे नाव पुन्हा चर्चेत आणले आहे. बहुतांश समर्थक व कार्यकर्त्यांचा व्होरा हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणजे इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून लढावे, तर काही कार्यकर्त्यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घ्यावी, अशी आहे. नुकताच हर्षवर्धन पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. या अभिष्टचिंतन सोहळ्यात पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त करत विधानसभा निवडणुकीसाठी आपणास दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बंडाचे संकेत दिले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाटील यांच्या संभाव्य बंडखोरी बाबत विचारणा केले असता त्यांनी हर्षवर्धन पाटील बाहेर जाणार असतील तर त्यांना जाऊ द्या, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या इंदापूर मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आमदार दत्तात्रय भरणे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टिकेची झोड उठवली. आमदार भरणे यांनी पाच हजार कोटींची कामे इंदापूर तालुक्यात आपण अजिदादांच्या नेतृत्वाखाली केली असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भरणे यांच्या या दाव्याला पुष्टी देत दत्तात्रय भरणे खोटं बोलत असल्याचे सांगून पाच हजार कोटीहून अधिक कामे आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून केली असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूर मधून दत्तात्रय भरणे उमेदवार असतील असे संकेत त्यांनी दिले.
दरम्यान इंदापुरात विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून तयारीत आहेत. सराटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचे जंगी स्वागत करत मोठा जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी देखील मोठे शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करून त्यांनी नुकताच सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे तुतारी चा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचे बंड अटळ असून ते अपक्ष लढणार की तुतारी हाती घेणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या आमदारकीची सुरुवात इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून झाली होती, दोन टर्म नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तब्बल वीस वर्ष आमदार राहिलेल्या हर्षवर्धन पाटील हे पंधरा वर्षाहून अधिक काळ मंत्री राहिलेले आहेत. अजित पवार यांच्याशी राजकीय वैर त्यांचे या कालावधीत असले तरी शरद पवार यांच्याशी मात्र त्यांनी नेहमी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पाटील यांच्याशी आमचे गेल्या अनेक वर्षापासून कौटुंबिक जिव्हाळा असल्याचे अनेक वेळा स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकंदरीत हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.