
काँग्रेसचे किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष? हर्षवर्धन सपकाळांनी दिली सविस्तर माहिती
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणुकीत विजय पराजय होत असतात, काँग्रेस पक्षाने अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत. पराभवाने खचून न जाता मोठ्या उत्साहाने लढण्याची ताकद, ऊर्जा व दृढ निश्चिय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांचा हा विश्वासच पक्ष संघटनेसाठी महत्वाचा असतो. याचा प्रत्यय या निवडणुकीत आला. काँग्रेस पक्षाचे नागपूर विभागात १४ नगराध्यक्ष व ३४० नगरसेवक, अमरावती विभागात ९ नगराध्यक्ष व २३६ नगरसेवक, मराठवाड्यात ५ नगराध्यक्ष व १५६ नगरसेवक, पश्चिम महाराष्ट्रात ३ नगराध्यक्ष आणि ४७ नगरसेवक, उत्तर महाराष्ट्रात २ नगराध्यक्ष व ४७ नगरसेवक आणि कोकण विभागात १ नगराध्यक्ष आणि २६ नगरसेवक निवडून आले आहेत. यासोबत काँग्रेस समर्थक स्थानिक आघाड्यांचे ७ नगराध्यक्ष व १५४ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना या निकालाने चोख उत्तर दिले आहे. काँग्रेसची विचारधारा हीच देशाला तारणारी आहे, पैशाच्या जोरावर सर्व निवडणूका जिंकता येऊ शकतात असा समज जनतेने खोडून काढला आहे.
भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पैशाचा प्रचंड वापर करून, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला असला तरी जनतेच्या मनात आजही काँग्रेस आहे व पुढेही ती कायम राहिल. ही विचाराची लढाई आहे आणि काँग्रेस विचारधारेपासून तसूभरही दूर गेलेला नाही. या संघर्षात साथ देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे, प्रत्येक कार्यकर्त्याचे मनापासून अभिनंदन आणि काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो. नगरपालिका निवडणुकीत मिळालेला विजय हा महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ऊर्जा देणारा आहे. महाभ्रष्ट भाजपा महायुतीपासून महाराष्ट्र वाचविण्याचा काँग्रेसचा हा लढा अखंडपणे सुरूच राहील, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.