'...म्हणून काँग्रेस शिवसेनेसोबत'; प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सांगितलं खरं कारण
मुंबई : भाजप महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजप संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडी व ‘इंडिया’ आघाडी काम करत आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील, त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मित्र पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यात परत एकदा राजकीय घडामोडी सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष आहे. किंबहुना, शरद पवार यांनाच महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा मानण्यात येते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिवसेनेसोबतच असल्याच्या सपकाळ यांच्या विधानाला महत्व आले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.
पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी
‘ऑपरेशन सिंदूर’चे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून, संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे. परंतु, भाजपचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा यांनी केलेले विधान भारतीय सैन्य दलाचा अपमान करणारे आहे. भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच जाहीर माफी मागावी, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही एक शिष्टाचार भेट होती, यावेळी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे. प्रबोधन ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे हे सांगितलेले आहे. भाजपा लोकशाही व संविधान विरोधी आहे. लोकशाही, संविधान व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढ्यात आगामी काळात सोबत राहणे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली.