
launch ceremony of 'Developed Nanded A Manifesto with Ashok Chavan Vision for Development
Nanded News : नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला भाजपाचा संकल्पनामा हा नांदेड शहराच्या सर्वांगिण विकासासाठी केलेला दूरदृष्टीचा आराखडा आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जाहीरनामा समितीचे प्रमुख माधव भंडारी यांनी केले. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’ च्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. शहरातील कुसुम सभागृहात प्रकाशन सोहळ्याचे आयोजन नववर्षाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. अजित गोपछडे, आ. श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती होती.
दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी बोलताना माधव भंडारी म्हणाले की, “गोदावरीचा आशीर्वाद असणारे तसेच गुरू गोविंदसिंघजी महाराज यांचे पावन स्थान असणारे नांदेड हे शहर मराठवाड्यातील महत्त्वाचे मोठे केंद्र आहे, नांदेड शहराला विकासाच्या खूप मोठ्या संधी आहेत, अशोक चव्हाणांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व नांदेड जिल्ह्याला तसेच भाजपाला मिळाले आहे, त्यांच्यामुळे मराठवाड्यात भाजपाच्या मागे एक मोठी ताकद उभी राहिली असून पहिल्यांदाच भाजपाने या ठिकाणी ६७ उमेदवार उभे केले आहेत, ही विशेष बाब आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे त्या म्हणाले की, “भाजपामध्ये ज्या उणीवा होत्या, त्या अशोकरावांमुळे भरून निघाल्या आहेत. पुढील पाच वर्षात सर्वांगिण विकास कसा करायचा, याचा सुक्ष्म आराखडा असणारा संकल्पनामा भाजपाने अशोक चव्हाणांच्या संकल्पनेतून तयार केला आहे, मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने संकल्पनामा प्रकाशित करणारे नांदेड हे पहिले महानगर आहे, असे सांगत भाजपाला मनपाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळेल,” असा विश्वास भंडारी यांनी यावेळी व्यक्त केला. जाहीरनामा निर्मितीत योगदान देणारे प्रवक्ते संतोष पांडागळे, अतुल व रुपेश भुरेवार, सचिन मोहिते यांचा यावेळी खासदार चव्हाण यांनी सन्मान केला.
नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा संगम
पुढे ते म्हणाले की, “नांदेड भाजपामध्ये नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या संगम जुळवून आणण्याचे काम अशोक चव्हाणांनी केले आहे. लहान लहान बाबींवर लक्ष देत शहराच्या विकासाच्या अनुषंगाने दूरदृष्टीचा आराखडा तयार केला आहे. विकास करण्याची क्षमता अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात असून प्रशासनातील कौशल्याचा वारसा शंकरराव चव्हाण यांच्यापासून त्यांना मिळाला आहे, या कौशल्याचा उपयोग नांदेड शहराला आज होत आहे,” असे माधव भंडारी म्हणाले.
अयोध्या, वाराणसीच्या धर्तीवर नांदेडचा विकास
भंडारी म्हणाले की, “नांदेडला ऐतिहासिक, सांस्कृतिक मोठी परंपरा असून गुरू गोविंदसिंघजी महाराज, स्वामी रामानंद तीर्थ यांचा पावन स्पर्श या भूमीला झाला आहे. नांदेड हे विद्यचे, अध्यापनाचे संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र असून स्व. नरहर कुरुंदकर, स्व. सुधाकरराव डोईफोडे, शेषराव मोरे यांच्या सारख्या विचारवंतांचा वारसा नांदेडला लाभला आहे. असे सांगत भंडारी यांनी नांदेडच्या भूमीचा गौरव केला.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे जसे व्हीजन आहे, तसेच व्हीजन या संकल्पनाम्याच्या सुंदर मांडणीतून अशोकरावांचे असल्याचे दिसून आले आहे, नांदेड हे पुढील काळात अधिकाधिक विकसित होत एक औद्योगिक केंद्र बनेल,” असा विश्वास यावेळी भंडारी यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक भाजपचे महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यानी केले. राजूरकर यानी संकल्पनामा कसा शहराच्या विकासासाठी पूरक, पोषक आहे, याची मांडणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.