पुणे : शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी (दि. 19) पुण्यातील लाल महाल ते शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शहरामध्ये सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण असून जोरदार तयारी सुरु आहे. शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळ्यासाठी श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानचा स्वराज्य रथ सज्ज झाला आहे. प्रतिष्ठाणच्या वतीने या वर्षीच्या स्वराज्य रथावर किल्ले रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
दरवर्षी पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मर्द मावळ्याच्या पराक्रमांची प्रतिकृती साकारली जाते. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील शिवजयंती स्वराज्य रथासोबत चित्तथरारक खेळ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांचा जिवंत देखावा सुद्धा सादर करण्यात येणार आहे. प्रतिष्ठाणच्या शिवजयंती उत्सवाचे यंदा पाचवे वर्ष आहे.
या स्वराज्य रथ सोहळ्याचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ कायदा शाखेचे तहसीलदार मधुसूधन बर्गे आणि निवृत्त सहायक पोलिस आयुक्त भानूप्रताप बर्गे यांच्या हस्ते लाल महाल येथील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. या वेळी बर्गे घराण्यातर्फे राजमाता जिजाऊ आणि शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी कोरेगाव, चिंचनेर, बारामती, इंदापूर, फलटण, कराड, कोल्हापूर, चाकण, पुणे, पलुस, बीड, पंढरपूर, अकलूज, मसूर, मुंबई शेनोली येथील बर्गे घराण्यातील मान्यवर सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकात स्थायिक झालेले बर्गे बांधव एकत्र येणा आहेत.या सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रतिष्ठाणचे प्रणव बर्गे, विक्रम बर्गे, राहुल बर्गे, महेश बर्गे, विकास बर्गे, अमोल बर्गे, नितीन बर्गे, शिरीष बर्गे, विरेंद्र बर्गे, अमित बर्गे, पोपटराव बर्गे, पांडुरंग सुतार, सुनील बर्गे, विशाल बर्गे आदी परिश्रम घेत आहेत.