गडचिरोलीत पावसाची संततधार सुरूच; नदी-नाल्यांना पूर, जिल्ह्यातील 5 मार्ग झाले बंद
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता होताना दिसत आहे. त्यातच गडचिरोलीत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच मंगळवारी (दि.1) जिल्ह्यातील विविध ठिकाणी नद्या, नाल्यांवर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने कुरखेडा तालुक्यातील 5 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पुरामुळे बंद झालेल्या मार्गांमध्ये कुरखेडा-मालेवाडा, आरमोरी तालुक्यातील मांगदा कुलकुली, कुरखेडा-तळेगाव-पळसगाव, कढोली-उराडी आणि मालेवाडा खोब्रामेंढा रस्त्यांचा समावेश आहे. दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात नद्या आणि नाल्यांना पूर येतो. अनेक गावांचा संपर्क तुटतो. याचे मुख्य कारण म्हणजे नद्या आणि नाल्यांवर असलेले कमी उंचीचे पूल. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाल्यांची पाण्याची पातळी वाढली आहे.
दरम्यान, पुरामुळे कुरखेडा आणि आरमोरी तालुक्यातील अंतर्गत 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कुरखेडा तालुक्यातील खोब्रागडी नदीवर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे कुरखेडा-मालेवाडा हा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच कढोली-उराडी मार्गावर असलेल्या स्थानिक नाल्याला पूर आल्याने हा रस्ता सुद्धा बंद करण्यात आला आहे. ज्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा आणि इतर वाहन सेवा ठप्प पडली आहे. लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सती नदीला पूर; वाहतूक बंद
कुरखेडा तालुका मुख्यालयाजवळून वाहणाऱ्या सती नदीवर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी तयार केलेल्या रपट्यावर 3 फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे आंतरराज्यीय वाहतुकीवर परिणाम झाला आहे. छत्तीसगड आणि कर्नाटकातून येणाऱ्या जड वाहनांच्या रांगा नदीजवळ लागल्या आहे.
देसाईगंज महसूल मंडळात ढगफुटी
मागील 24 तासात देसाईगंज महसूल मंडळात ढगफुटी झाली असून, या सर्कलमध्ये 209 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर 3 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यात कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा मंडळात 154.2 मिमी, धानोरा तालुक्यातील मुरुमगाव मंडळात 132.6 मिमी व देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मंडळात 132 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
हेदेखील वाचा : PMRDA Officers Transfer पीएमआरडीएमधील अधिकार्यांच्या बदल्या; अतिक्रमण व अभियांत्रिकी विभागात मोठे बदल