कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; हवामान विभागाकडून चार दिवस 'ऑरेंज अलर्ट' जारी...
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच अवकाळी पावसाबरोबरच यंदा मान्सून वेळेच्या अगोदरच दाखल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला आहे. सततच्या या पावसामुळे गेल्या काही वर्षात प्रथमताच रोहिणीचा पेरा शेतकऱ्यांचा चुकला आहे. हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पावसाचेच राहण्याची शक्यता अधिक आहे.
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर यंदाची पेरणी होती का नाही याबाबतची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. यंदा अवकाळी पावसाने कहरच केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू झाल्याने हा पाऊस ऊस पिकाला पोषक असला तरी अन्य पिकाला घातक ठरला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकाबरोबरच उन्हाळी पिके सुद्धा घेतली आहेत. मात्र, या पावसामुळे या सर्व पिकांवर पाणी फिरवले आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, भुदरगड तर राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. या पावसामुळे ओढा, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, त्याचबरोबर गटारीसुद्धा भरून वाहू लागले आहेत. सततच्या या पावसामुळे छोट्या-मोठे रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबून राहिली आहे. पंचगंगा, वारणा, तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी या नदीवरील असणारे बंधारे ओव्हरफ्लो झाल्यामुळे बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे.
ठाण्यातही पावसाचा इशारा
राज्यात मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिल्यानंतर स्पष्ट केले.
रेनकोट, छत्री खरेदीसाठी गर्दी वाढली
सोमवारी काही अंशी पावसाने उसंत खाल्ली असली तरी अधून मधून सरी कोसळतच होत्या. पावसाचा जोर असल्याने नागरिकांनी छत्री, रेनकोट, जॅकेट, पावसाळी टोपी खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी केली आहे. यामध्ये शालेय मुलांची संख्या लक्षणे दिसत होती. अवघ्या काही दिवसावर शालेय सत्र सुरू होणार असल्याने पालकांनी खरेदी सुरू केली आहे.