शिराळा : चांदोली धरणाच्या (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातून १३ हजार ५६१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत धरणातील पाणी पातळी सव्वा मीटरने तर साठा सव्वा टीएमसीने वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
पावसाचा जोर कायम असल्यामुळे येथे अतिवृष्टी होत आहे. धरणातून ७९३ क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू केला आहे. कोकरूड-रेठरे बंधारा तीन दिवस पाण्याखाली आहे.
धरण सध्या ३९.४६ टक्के भरले आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६०१.२५ मीटर झाली असून, पाणीसाठा १३.५८ टीएमसी झाला आहे. एकूण पाऊस ४४३ मिलीमीटर झाला आहे.
सध्या पावसाची संततधार कायम सुरुच आहे. पाणलोट क्षेत्रात तर मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या ठिकाणी पाऊस कमी असला तरी परिसरात वाराही सोसाट्याचा वाहतो आहे. हवेत कमालीचा गारठा आहे, वीजपुरवठाही वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशाराही धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.
धुव्वाधार पावसामुळे भात रोप लागण करण्याची धांदल सुरू आहे. उभ्या पावसात रोप लागणीची कामे महिला करत आहेत. अद्यापही कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस सुरूच आहे.






