माण तालुक्यात पावसाचा हाहा:कार; म्हसवड शहरात पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत
म्हसवड : माण तालुक्याला पावसाने अक्षरश: हाहा:कार माजवला असल्याने तालुक्यातील सर्व ओढे, नाले, तलाव पाण्याने ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. अशातच शनिवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा धुव्वाधार बॅटिंग केल्याने म्हसवड परिसरातील अनेक भागात पावसाचे पाणी शिरल्याचे दिसून आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
म्हसवड शहरातील शिंगणापूर चौकातील सर्व दुकानात पाणी शिरले तर या परिसरातील पेट्रोल पंपातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा मार्ग काही काळाकरीता बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली. तर येथील यात्रा पटांगणावर उतरलेल्या सर्कशीच्या तंबूतही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या वतीने सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, आवश्यकतेनुसारच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी केले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert: पुढील काही तासांत पावसाचं ‘महावादळ’; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस नुसता धुवून काढणार
हवामान खात्याने पुढील दोन दिवस असाच पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. पाणी असलेल्या ठिकाणी जाऊ नये, विनाकारण रस्त्यावर थांबून वाहतुकीला अडथळा आणू नये, ही वेळ मनोरंजन करण्याची नाही तर स्वत:सह आपल्या परिसराची काळजी घेण्याची आहे, पोलीस प्रशासन २४ तास रस्त्यावर थांबून आपली काळजी घेत आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन म्हसवड पोलिसांनी केले.
दरम्यान, शनिवारी सकाळपासून धो-धो बरसणाऱ्या या पावसामुळे शहराला जोडणारे ग्रामीण भागातील अनेक रस्ते पुलाखाली गेल्याने ग्रामीण जनतेचे मोठे हाल झाले. ग्रामीण भागातील अनेकांना म्हसवड दर्शन झाले नाही.
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीमधील देवापुर – शिरताव, विरकरवाडी – देवापूर, म्हसवड – पुळकोटी, पुळकोटी – गंगोती, पळसावडे – देवापूर, ढाकणी – ढाकणी फाटा, बनगरवाडी – वरकुटे मलवडी, काळचौंडी – झरे, महाबळेश्वर वाडी – काळचौंडी आदी गावांना जोडणारे पूल, साकव पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क शनिवारी सकाळपासून तुटला होता. दुपारी पाऊस कमी झाल्यावर पाणी ओसरल्यानंतर काही गावांचा संपर्क पूर्ववत होत गेला.
प्रशासनाची कार्यतत्परता
संपर्कहीन झालेल्या या सर्व गावांना पोलीस प्रशासन, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार सचिन अहिरे, मीना बाबर आदींनी भेटी देत तेथील आढावा घेतला. तर म्हसवड शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी पालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात ठेवत सर्वत्र भेटी देत नागरीकांकडे चौकशी करत होते.
अनेक दुकानांत शिरले पाणी
म्हसवड एसटी बसस्थानकासमोर असलेल्या ढालेमामा कॉम्पलेक्सच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने त्याठिकाणी असणाऱ्या दुकानगाळ्यांमध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर तेथील व्यावसायिकांचे नुकसान झाले. तर येथील यात्रा पटांगणावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने याठिकाणी उतरलेल्या सर्कशीच्या तंबूत पाणी शिरल्याने त्यांचे सर्व शो बंद ठेवावे लागले.